
बदलापूरमधील स्त्रीबीज विक्रीचे कनेक्शन ठाण्यात समोर आल्यानंतर महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे. ठाण्यातील 11 आयव्हीएफ आणि 269 सोनोग्राफी सेंटरची झाडाझडती घेण्याचे काम आरोग्य विभागाने सुरू केले असून यासाठी सहा विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. शहरातील आयव्हीएफ, सोनोग्राफी सेंटरची कसून तपासणी केली जाणार असल्याने हे सेंटर्स प्रशासनाच्या रडारवर आले आहेत.
नाशिकमध्ये मालती आयव्हीएफ केंद्राला परवानगी देण्यात आली असताना ठाण्यात मात्र त्याची शाखा बेकायदेशीरपणे सुरू होती. त्याची कोणतीही नोंदणी ठाणे पालिकेकडे करण्यात आली नव्हती. याच केंद्रात स्त्रीबीज विक्रीचा प्रकार बेकायदा सुरू होता. बदलापूर पोलिसांच्या कारवाईतून ही माहिती उघड होताच या केंद्रावर पोलीस आणि पालिकेच्या आरोग्य विभागाने धाड टाकून कारवाई केली. तसेच ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारवाईनंतर हे केंद्र आता बंद करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाकडून तत्काळ सहा विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. सेंटरमध्ये नेमके काय काम सुरू आहे? सेंटरची नोंदणी अधिकृत आहे का? याची संपूर्ण प्रकरणाची माहिती पथकांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सोनोग्राफी सेंटरचीही तपासणी करण्यात येणार आहे.
काही बेकायदेशीर आढळल्यास तत्काळ कारवाई
स्त्रीबीज विक्रीचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आल्यानंतर सर्वच केंद्राची तपासणी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. शहरातील आयव्हीएफ, सोनोग्राफी केंद्राची तपासणी करण्याबरोबरच अवैध केंद्रांचा शोध घेण्यात येणार आहे. दरम्यान, एखाद्या आयव्हीएफ किंवा सोनोग्राफी सेंटरमध्ये बेकायदेशीरपणे काम आढळल्यास या सेंटरवर कारवाई करून ते तत्काळ बंद करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
बदलापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्यात सर्वच आयव्हीएफ सेंटर आणि सोनोग्राफी सेंटरची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत काही सेंटरची पाहणी करण्यात आली असून या सेंटरमध्ये अद्याप बेकायदेशीरपणे काम होत असल्याचे आढळले नाही. नागरिकांकडे काही माहिती असल्यास त्यांनी आरोग्य विभागाला माहिती द्यावी.
डॉ. प्रसाद पाटील
(मुख्य आरोग्य अधिकारी, ठाणे पालिका)





























































