
>> अरुण
अलास्का प्रांत म्हणजे अमेरिकेला लागलेली लॉटरीच. क्रिमियातील लढाईनंतर रशियाला अलास्कासारखा प्रांत आर्थिकदृष्टय़ा रशियाला डोईजड झाला होता. तत्कालीन रशियन झार म्हणजे राजा दुसरा अलेक्झांडर याला भीती वाटायला लागली की इंग्लंड या प्रांतावर ताबा मिळवेल. आधीच प्रचंड विस्ताराचा विशाल भूधर असलेला देश मास्कोमध्ये राहून सांभाळणे झारला कटकटीचं ठरत होतं. त्यातच इंग्लंडशी लढाई करण्याची वेळ आली तर सैन्य गुंतून पडणार. म्हणून त्याने सुज्ञ विचार करून केवळ 72 लाख डालरमध्ये अलास्का नावाच्या 17 लाख 23 हजार चौरस किलोमीटरच्या प्रांताचा सौदा केला. कदाचित 1867 मध्ये झारला ही रक्कम खूपच मोठी वाटली असेल. या करारावर अमेरिकेचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री विल्यम स्टीवार्ड यांनी सही केली तेव्हा ‘स्टीवार्डस् फाली’ म्हणजे ‘मूर्खासारखा करार’ अशी टीका त्यांच्यावर झाली. कारण तेव्हा अमेरिकेला आणि रशियनांनाही अलास्का ही अक्षरशः सोन्याची खाण आहे याची कल्पना नव्हती. स्टावॉर्ड यांच्या कथित मूर्खपणाने अमेरिकेचा पुढे अनंतकाळ फायदाच फायदा होणार होता.
अवघ्या साडेसात लाख लोकसंख्येचा हा प्रांत आकाराच्या हिशेबाने टेक्सास, पालिफोर्निया आणि मान्टाना या तीन अमेरिकन राज्यांच्या एकत्रित क्षेत्रफळापेक्षा मोठा आहे. मूळ अमेरिकन म्हणजे ‘युनायटेड स्टेस्टस् आाफ अमेरिका’ या देशातले हे 4 हजार किलोमीटर दूर असलेले राज्य आहे. मध्ये पानडा आहे.
अमेरिकेने अलास्का रशियाकडून विकत घेतलं आणि काही काळातच तिथल्या सोन्याच्या खाणींमधून सोने काढण्यासाठी ‘गोल्ड रश’ सुरू झाली. त्याचबरोबर खनिज तेलाचे प्रचंड साठे, अमेरिकेला या प्रांतात सापडले. त्याबरोबर नैसर्गिक वायू आणि इतर अनेक प्रकारच्या साधनसंपत्तीने अमेरिकेच्या राजकोषात भरभरून दान टाकले.
अमेरिकेने 1975 ते 1977 या काळात तर अलास्कातील खनिज तेल आणण्यासाठी कठीण दऱयाडोंगरांमधून सुमारे 1200 किलोमीटरची आणि 4 फूट व्यासाची प्रचंड पाइपलाइन टाकली. सध्या अमेरिकेच्या एकूण खनिज तेल उत्पादनापैकी सुमारे 4 टक्के उत्पादन एकटय़ा अलास्कामध्ये होते.
कदाचित आता रशियाला अलास्काच्या विक्रीचा पश्चात्ताप होत असेल. कारण अवघी 72 लाख डालर किंमत ठरवलेला हा प्रांत अमेरिकेला नंतर अब्जावधी डालर मिळवून देऊ लागला. अमेरिकेसाठी तो लाटरीच ठरला!

























































