
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रातील दोन दिग्गज कंपन्या ‘ओपनएआय’चे सीईओ सॅम ऑल्टमॅन आणि ‘एन्थ्रॉपिक’चे सीईओ डारियो अमोदेई यांच्यातील स्पर्धा आता कायदेशीर आणि राजकीय वळणावर येऊन ठेपली आहे. अमेरिकेचे संरक्षण विभाग ‘पेंटागन’ने नुकताच एन्थ्रॉपिक कंपनीला ‘सप्लाय चेन रिस्क’ (पुरवठा साखळीसाठी धोका) म्हणून घोषित केले आहे. या निर्णयामुळे अनेक सरकारी कंपन्या आणि संरक्षण कंत्राटदारांना एन्थ्रॉपिकच्या सेवा वापरणे बंद करावे लागणार आहे. पेंटागनच्या या भूमिकेमुळे एआय उद्योगात मोठी खळबळ उडाली आहे.
पेंटागनने 4 मार्च रोजी एन्थ्रॉपिकला यासंदर्भातील एक पत्र पाठवले आहे. या पत्रात म्हटले आहे की, ही एआय कंपनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते. सामान्यतः ‘सप्लाय चेन रिस्क’ हा टॅग हुवावे (Huawei) सारख्या परदेशी कंपन्यांना दिला जातो, मात्र एखाद्या अमेरिकन कंपनीला अशा प्रकारे लक्ष्य करण्याची ही पहिली वेळ आहे. या निर्णयावर डारियो अमोदेई यांनी तीव्र आक्षेप घेतला असून पेंटागनला न्यायालयात खेचण्याची घोषणा केली आहे. “आमच्याकडे कोर्टात जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही,” असे कंपनीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे, ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमॅन यांनी या वादात उडी घेत एन्थ्रॉपिकच्या भूमिकेवर टीका केली आहे. मॉर्गन स्टॅनली तंत्रज्ञान परिषदेत सॅम ऑल्टमॅन यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “कोणतीही खाजगी कंपनी सरकारपेक्षा मोठी असू शकत नाही.” दरम्यान, एन्थ्रॉपिकच्या सीईओनी आपल्या युजर्सना आश्वासन दिले आहे की, या निर्णयाचा सामान्य वापरकर्त्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. आता ही कायदेशीर लढाई काय वळण घेते, याकडे संपूर्ण तंत्रज्ञान जगाचे लक्ष लागले आहे.
























































