Israel Iran War – होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतुकीबाबत इराणची महत्त्वाची अट; जग दोन गटात विभागणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका,इस्रायल- इराण युद्धाची तीव्रता आता वाढत आहे. मंगळवारी आखाती देशातील या युद्धाचा ११ वा दिवस आहे. दोन्ही बाजूंमधील सतत हल्ले सुरूच आहेत. अमेरिका आणि इस्रायल इराणी लष्करी तळांवर, क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांवर आणि दळणवळण नेटवर्कवर सतत हवाई हल्ले करत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की इराणच्या नौदल, हवाई दल आणि ड्रोन क्षमतांना मोठे नुकसान झाले आहे आणि त्यांच्या लष्करी पायाभूत सुविधांमध्ये कमकुवतपणा आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतुकीबाबत एक महत्त्वाची अट घातली आहे. त्यामुळे जग दोन गटात विभागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इस्रायल इराणी तेल कारखाने, साठवणूक केंद्र आणि प्रतिष्ठानांना लक्ष्य करत आहे. या हल्ल्यांमुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेवर होणाऱ्या परिणामांबद्दल चिंता निर्माण झाली आहे. इराण देखील सतत प्रत्युत्तरात्मक हल्ले करत आहे. इराणने इस्रायल, अमेरिकन लष्करी तळ आणि काही आखाती देशांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले आहेत. काही क्षेपणास्त्रे आखाती तेल प्रतिष्ठान आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांजवळही पडली. त्यामुळे संपूर्ण प्रदेशात तणाव वाढला आहे आणि तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या वर गेल्या आहेत.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इराणने घोषणा केली की, इस्रायल आणि अमेरिका राजदूतांना निष्कासीत करत देशाबाहेर काढणाऱ्या देशांनाच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलवाहतूक करण्याची परवानगी दिली जाईल. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांबाबत एक मोठे विधान जारी केले आहे. तेहरान टाईम्सने इराणी क्रांतिकारी गार्ड्सचा हवाला देत म्हटले आहे की, आयआरजीसीने घोषणा केली आहे की, इस्रायली आणि अमेरिकन राजदूतांना देशाबाहेर काढणाऱ्या कोणत्याही अरब किंवा युरोपीय देशाला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आणि अधिकार असेल, इराणच्या या अटीमुळे जग दोन गटात विभागले जाण्याची शक्यता आहे.

हिजबुल्लाहची लष्करी ताकद कमकुवत करण्यासाठी इस्रायली संरक्षण दलांनी सुरू केलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून, लेबनॉनमधील हिजबुल्लाहशी संलग्न अल-कुर्द अल-हसन असोसिएशनच्या अनेक तळांवर हल्ला करण्यात आला आहे. तसेच अमेरिकन नागरिकांना आखाती देश सोडण्याचे आवाहन करत युएईमधील अमेरिकन दूतावासाने सल्लागार जारी केला आहे. अमेरिकेने सुरक्षा परिस्थितीमुळे मध्य पूर्वेत राहणाऱ्या आपल्या नागरिकांना हा प्रदेश सोडण्याचा विचार करण्याचे आवाहन केले आहे. युएईमधील अमेरिकन दूतावासाने या परिस्थितीबाबत सल्लागार जारी केला आहे.