
आसाममध्ये आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. या निवडणुकीच्या तोंडावर आसाममधील भाजप सरकारने ‘बिहार’ पॅटर्न लावत राज्यातील 40 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 9 हजार रुपये टाकण्याची घोषणा केली आहे. महिला दिनाच्या निमित्त मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी ही घोषणा केली.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीआधी नितीश कुमार सरकारने राज्यातील महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपये टाकले होते. याचा निवडणुकीमध्ये त्यांना मजबूत फायदाही झाला. आता हाच पॅटर्न राबवत आसाममधील हिमंत बिस्वा सरमा सरकारने राज्यातील 40 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 9 हजार रुपये टाकण्याची घोषणा केली. 10 मार्च 2026 पासून याच्या अंमलबजावणीस सुरुवातही झाली आहे.
आसाममधील महिलांच्या नेतृत्वाखालील कुटुंबांना बळकट करण्याच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री कार्यालयाने एक्सवर पोस्ट करून दिली. पुढील विधानसभा निवडणुकीशी या योजनेचा कोणताही संबंध नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच ही योजना सरसकट सर्वांसाठी नसून, केवळ ठराविक निकष पूर्ण करणाऱ्या महिलांसाठीच आहे, असल्याचेही ते म्हणाले.
काय आहे ही योजना?
आसाम सरकारची ओरुनोदाई ही दारिद्र्य निर्मूलन योजना आहे. 2020 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1250 रुपये मिळतात. आता चार महिन्यांचे एकत्र 3600 कोटी रुपयांचे अनुदान राज्यातील 40 लाख महिलांच्या खात्यामध्ये 10 मार्चला वर्ग केले जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील महिलांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

























































