CBSE बोर्डाचा अजब कारभार, गणिताच्या पेपरवरील QR कोड स्कॅन करताच वाजले गाणे! विद्यार्थी चक्रावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाची (CBSE) 12 वीची गणिताची परीक्षा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सोमवारी झालेल्या या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेवर सुरक्षेसाठी आणि ऑथेंटिकेशनसाठी देण्यात आलेला QR कोड स्कॅन केल्यावर थेट यूट्यूबवर एक इंग्रजी गाणे सुरू होत असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. ब्रिटिश गायक रिक एस्टली यांचे 1987 मधील प्रसिद्ध गाणे “Never Gonna Give You Up” या कोडमुळे प्ले होत असल्याने बोर्डाने विद्यार्थ्यांची चेष्टा केली की काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

प्रश्नपत्रिकेवरील हा QR कोड खरंतर पेपरची सत्यता पडताळण्यासाठी आणि गोपनियता राखण्यासाठी असतो. मात्र, ऐन परीक्षेच्या दबावाखाली असताना अशा प्रकारची तांत्रिक त्रुटी समोर आल्याने बोर्डाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 2026 च्या या बोर्ड परीक्षेत अशा प्रकारे विद्यार्थ्यांना ‘रिकरोल’ (Rickroll) करणे हा खोडसाळपणा आहे की मोठी सुरक्षा चूक, यावरून पालक आणि तज्ज्ञांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ आणि स्क्रीनशॉट्स तुफान व्हायरल होत असून बोर्डाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.

या घटनेनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (X) मीम्सचा पूर आला आहे. एका विद्यार्थ्याने संताप व्यक्त करत लिहिले की, “मी तिथे गणितातील अवघड समीकरणे सोडवण्याचा प्रयत्न करत होतो आणि बोर्ड मात्र आम्हाला ‘Never Gonna Give You Up’ ऐकवत होते.” अनेक युजर्सनी थेट शिक्षण मंत्रालय आणि सीबीएसईला टॅग करून या प्रकरणावर स्पष्टीकरण मागितले आहे. इतक्या मोठ्या स्तरावरील परीक्षेत एवढी मोठी चूक कशी होऊ शकते, असा सवाल विचारला जात असून हा पेपर लीकचा किंवा सुरक्षेतील त्रुटीचा प्रकार तर नाही ना? अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

सामान्यतः प्रश्नपत्रिकेवर दिलेला QR कोड हा प्रत्येक सेटसाठी युनिक असतो, जो पेपर अधिकृत असल्याची खात्री देतो. तसेच ट्रॅकिंग आणि बनावटगिरी रोखण्यासाठी याचा वापर केला जातो. मात्र, अधिकृत माहितीऐवजी थेट म्युझिक व्हिडिओची लिंक त्या कोडमध्ये असणे हे तांत्रिकदृष्ट्या अनाकलनीय आहे. सीबीएसईने अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु या विचित्र प्रकारामुळे 12 वीच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.