
इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमधील शहरान आणि शहर-ए-रेय येथील तेल साठवण डेपोवर शनिवारी उशिरा केलेल्या हल्ल्यानंतर शहरावर दाट काळे ढग पसरले असून “काळ्या विषारी तेलाच्या पावसासारखे थेंब” पडत असल्याची माहिती समोर आली आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांना श्वास घेण्यास मोठा त्रास होत असून वातावरणात तीव्र तेलाचा वास पसरल्याचे सांगितले जात आहे.टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.
हिंदुस्थानमध्ये राहणाऱ्या इराणी नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार तेथील गंभीर परिस्थिती सांगितली. मध्य तेहरानमध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांशी संवाद झाल्याचे सांगत अबगीने खाकी यांनी सांगितले की, “रविवारी सकाळी उठल्यानंतर भयावह दृश्य दिसले. सकाळी 10 वाजेपर्यंतही इतका अंधार होता की रात्रीसारखे वाटत होते. घरात असतानाही श्वास घेणे कठीण झाले आहे. लहान मुले, वृद्ध आणि पाळीव प्राणी सर्वच त्रस्त आहेत.”
त्यांच्या मते, या हल्ल्यांमुळे पर्यावरणाला मोठे नुकसान होत असून सर्वांसाठी परिस्थिती धोकादायक बनली आहे. “रुग्णालयातील रुग्णांचा आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांचा विचार करा, ज्यांना कामासाठी बाहेर पडावे लागते,” असेही त्यांनी सांगितले.
काही अहवालांनुसार तेल डेपोवर झालेला हल्ला अपेक्षेपेक्षा अधिक तीव्र होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील एका सल्लागाराने या लक्ष्यांवर हल्ला करण्याच्या कल्पनेला पसंती नसल्याचेही सांगितले असल्याचे वृत्त आहे.
मुंबईत राहणाऱ्या एका इराणी नागरिकाने सांगितले की, सरकारने नागरिकांना मास्क घालण्याचे निर्देश दिले आहेत. मोठ्या प्रयत्नांनंतर त्यांना वडिलांशी काही सेकंदांसाठीच संपर्क साधता आला. “हवेत तेलाचा तीव्र वास आहे. मात्र सर्वाधिक नुकसान काळ्या विषारी पावसाच्या थेंबांमुळे होत आहे,” असे त्यांनी सांगितले.
या हल्ल्यानंतर किराणा वस्तूंच्या किंमती वाढल्या असून मोठ्या नुकसानीमुळे सरकारने वाहनांसाठी दररोज केवळ 5 लिटर इंधनाची मर्यादा लागू केली आहे, असेही त्यांनी सांगितले. “सामान्य इराणी नागरिक सर्वाधिक त्रस्त आहेत,” असे त्यांनी नमूद केले.
डॉक्टरांच्या मते, या परिस्थितीत आम्लयुक्त पावसाचा परिणाम विशेषतः आधीपासून आजारी असलेल्या लोकांवर गंभीर होऊ शकतो. त्वचा, डोळे आणि फुफ्फुसांशी संबंधित आजार वाढण्याची शक्यता आहे. देहरादून येथील शासकीय दून वैद्यकीय महाविद्यालयाचे फुफ्फुसरोग विभाग प्रमुख डॉ. अनुराग अग्रवाल यांनी सांगितले की, “या परिस्थितीत दमा, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) तसेच तीव्र श्वसन त्रासाची समस्या निर्माण होऊ शकते. घरात राहणे, मास्क आणि गॉगल वापरणे तसेच ओल्या कापडाने चेहरा झाकणे अशा उपाययोजना करणे आवश्यक आहे.”
दरम्यान, इंटरनेट आणि दूरध्वनी सेवा बंद झाल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. दिल्लीमध्ये राहणारे इराणी नागरिक मोहम्मद कश्मीरी यांनी सांगितले की, “इंटरनेट आणि फोन सेवा बंद असल्याने नागरिकांना संपर्क साधणे कठीण झाले आहे. ‘बाले’ हे सरकारच्या नियंत्रणाखालील मेसेजिंग अॅपच सध्या संवादाचे एकमेव साधन उरले आहे. मात्र त्यात एंड-टू-एंड एन्क्रिप्शन नसल्याने गोपनीयता राहत नाही.”
इंटरनेटचा स्पीड अत्यंत कमी असल्याने आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधणेही कठीण होत असल्याचे त्यांनी सांगितले. या कम्युनिकेशन ब्लॅकआउटमुळे नागरिकांना आपत्कालीन संदेशही मिळत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे.
असे असले तरी, कठीण परिस्थितीतही लोक एकमेकांना मदत करत असल्याचे खाकी यांनी सांगितले. “लोक आपल्या शेजाऱ्यांच्या आणि अनोळखी लोकांच्या दारावर जाऊन मदतीची गरज आहे का हे विचारत आहेत. आम्हाला विश्वास आहे की आमच्या देशाच्या इतिहासातील हा कठीण काळही निघून जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

























































