राज्यपालांच्या राजीनाम्यात काहीतरी काळेबेरे आहे; ममता बॅनर्जी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांच्या राजीनाम्यावर आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला. कोलकाता येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यपालांच्या राजीनाम्यात काहीतरी काळेबेरे असल्याचा आरोप केला. परिस्थिती अशीच राहिली तर लोकभवन देखील “भाजप भवन” मध्ये बदलले जाईल असा आरोपही त्यांनी केला.

ममता बॅनर्जी यांनी यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा साधला. मंगळवारी झालेल्या बैठकीत ज्ञानेश कुमार यांनी राज्य अधिकाऱ्यांना धमकावले असा आरोप त्यांनी केला आहे. तृणमूल काँग्रेसनेही या मुद्द्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. कोलकाता येथे झालेल्या महत्त्वाच्या निवडणूक बैठकींमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांचे वर्तन अधिकाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करणारे असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे भाजप नेत्यासोबतच हॉटेलमध्ये राहत आहेत, त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी दावा केला की मुख्य निवडणूक आयुक्त पश्चिम बंगालच्या दौऱ्यात भाजप नेते जिथे राहतात त्याच हॉटेलमध्ये राहत आहेत. अभिषेक म्हणाले की ही निवडणूक भाजपला धडा शिकवण्याची संधी आहे. कोलकातामध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांना काळे झेंडे दाखवण्यात आले, निदर्शकांनी “परत जा” असे नारे दिले.

अभिषेक बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्यावरही टीकास्त्र सोडले. त्यांनी सांगितले की त्यांनी राजकारणात अनेक “अग्निपरीक्षा” अनुभवल्या आहेत आणि प्रत्येक वेळी जनतेच्या पाठिंब्याने ते जिंकले आहेत. जय शाह यांना कोणत्या परीक्षेचा सामना करावा लागला ज्यामुळे ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाले? असा सवाल अभिषेक यांनी विचारला. त्यांनी अमित शाह यांना आव्हान देत म्हटले की, जर केंद्र सरकारला खरोखरच घराणेशाही संपवायची असेल तर त्यांनी संसदेत असा कायदा आणावा जो कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला राजकारणात सहभागी होण्याची परवानगी देतो.