
हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरलेली ‘युनिव्हर्स’ ही संकल्पना आता मराठी चित्रपटसृष्टीतही पाऊल ठेवत आहे. परस्परांशी जोडलेली कथानके आणि पात्रांच्या माध्यमातून एक भव्य गोष्ट सादर करण्याचा पहिला धाडसी प्रयोग ‘घबाडकुंड’ या चित्रपटाद्वारे केला जाणार आहे. थरार आणि रहस्याचा अद्भूत मेळ असलेला हा चित्रपट येत्या 19 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, मराठीतील पहिल्या ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’चा मान या चित्रपटाला मिळणार आहे. अनेक गुपिते आणि थरारक प्रसंगांना एकाच धाग्यात गुंफणारा हा अनुभव प्रेक्षकांसाठी नक्कीच विशेष ठरणार आहे.
निर्माते रसिक कदम यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून साकारत असलेल्या या चित्रपटाची धुरा दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांनी सांभाळली आहे. ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटाच्या यशानंतर पाटील आता ‘घबाडकुंड’च्या माध्यमातून भीती आणि रहस्याचा एक मोठा कॅनव्हास मांडत आहेत. नुकत्याच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि ‘फर्स्ट लूक’ एका दिमाखदार सोहळ्यात प्रसिद्ध करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव करण्यात आला, तसेच एका स्टायलिश फॅशन शोने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘आयकॉन दी स्टाईल’ ही कंपनी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करत आहे.
चित्रपटाची कथा आयुष्यातील अनपेक्षित वळणे, संशय आणि नशिबाचा खेळ यावर आधारित आहे. देवदत्त नागे, कुशल बद्रिके, संदीप पाठक, शशांक शेंडे, प्राजक्ता हनमघर यांसारख्या तगड्या कलाकारांची फळी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ मराठीतच नव्हे, तर दाक्षिणात्य भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. दाक्षिणात्य फाईट मास्टर कार्तिक यांनी यातील थरार दृश्ये दिग्दर्शित केली असून, अभिनय जगताप यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. मराठीत पहिल्यांदाच असा ‘युनिव्हर्स’चा प्रयोग होत असल्याने प्रेक्षकांमध्ये याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.


























































