हिंदुस्थानी जगज्जेत्यांना बीसीसीआयचे ‘नमन’, पाचही जगज्जेत्या संघांचा दिल्लीत विजयसोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी क्रिकेटचा विजयघोष आता दिल्लीच्या दरबारात दुमदुमणार आहे.  गेल्या वर्षभरात जागतिक क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या पाचही हिंदुस्थानी संघांचा हा गौरवसोहळा आयोजित करणार असल्याचे बीसीसीआयने जाहीर केले आहे. येत्या रविवार, 15 मार्चला वार्षिक ‘नमन’ पुरस्कार सोहळय़ाच्या निमित्ताने आयसीसीच्या विविध स्पर्धांमध्ये करंडक जिंकणाऱ्या पाचही हिंदुस्थानी संघांचा या मंचावर सन्मान करत नमन केले जाणार आहे.

एका वर्षात पाच जागतिक मुकुट

या सोहळय़ात नुकताच टी-20 विश्वचषक 2026 जिंकणाऱ्या हिंदुस्थानी पुरुष संघाचा भव्य गौरव केला जाणार आहे. त्याचबरोबर 2025 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या वरिष्ठ महिला संघालाही मानाचा मुजरा दिला जाईल. याशिवाय गेल्या महिन्यात झालेल्या युवा विश्वचषक जिंकणाऱ्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील युवा संघाचा आणि 2025 मध्ये 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकणाऱ्या हिंदुस्थानी कन्यांच्या संघाचाही सत्कार केला जाणार आहे. या सर्व संघांसह त्यांच्या प्रशिक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांनाही या सोहळय़ासाठी आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली.

नमनमध्ये पराक्रमाला वंदन

हिंदुस्थानी क्रिकेटच्या अलीकडील आंतरराष्ट्रीय यशाचा उत्सव म्हणून हा नमन सोहळा आयोजित केला जात असल्याचे बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितले. 2024-25 हंगामात आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये उज्ज्वल कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही या मंचावर गौरविण्यात येणार आहे. गेल्या एका वर्षात हिंदुस्थानी संघांनी जिंकलेल्या ऐतिहासिक करंडकांचा हा एकत्रित उत्सव ठरणार असल्याचेही सैकिया म्हणाले.

पंचतारांकित हॉटेलमध्ये क्रिकेटचा जल्लोष

हा सोहळा दिल्लीतील विमानतळाजवळील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. कार्यक्रमानंतर हिंदुस्थानी पुरुष संघातील अनेक खेळाडूंना थेट त्यांच्या आयपीएल संघांमध्ये दाखल व्हायचे आहे. कारण 28 मार्चपासून आयपीएलचा नवा हंगाम सुरू होणार असून त्याआधी सर्व संघांची सराव शिबिरे रंगणार आहेत. हिंदुस्थानी क्रिकेटच्या या सुवर्णयुगाचा उत्सव साजरा करणारी ‘नमन’ची ही संध्याकाळ म्हणजे जग जिंकणाऱ्या वीरांना दिलेला सामूहिक सलाम ठरणार आहे. या कार्यक्रमाला क्रिकेट जगतासह राजकीय आणि सिनेसृष्टीतील दिग्गजही उपस्थित राहणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या कार्यक्रमाच्या दिमाखदार आयोजनासाठी बीसीसीआयने कंबर कसल्याचे कळले आहे.