पोलीस डायरी – ‘बॉम्ब’च्या धमक्या कधी थांबणार? सरकार व विमान कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रभाकर पवार, [email protected]

आपल्या देशाची राजधानी दिल्लीत फेब्रुवारीअखेरीस तीन शाळांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली तेव्हा सर्व शाळा रिकाम्या करण्यात आल्या. त्याआधीही दिल्लीत जानेवारी अखेरीस पाच शाळांना धमक्या देऊन पोलिसांना कामाला लावण्यात आले होते.

गुजरातमधील ३४ शाळांसह उत्तराखंड, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील काही कनिष्ठ न्यायालयांना ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी देण्यात आली होती. या सर्वच ठिकाणी शोध मोहीम राबवताना पोलीस यंत्रणांची दमछाक झाली. बरं, हे देशभरात रोज सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला रोज कुठून ना कुठून अज्ञात व्यक्तीचा बॉम्ब ठेवल्याचा फोन येतो आणि कुणीच पकडला जात नाही. पकडला गेला तर एखादा ठार वेडा किंवा दारूडा असतो. आपल्या शत्रूला धडा शिकविण्यासाठीही काही जण बॉम्बची धमकी देतात. त्यामुळे विमाने रद्द केली जातात. हे गेली अनेक वर्षे अमर्यादपणे सुरू आहे.

शाळा, महाविद्यालये, विमानतळे आणि विमाने यामध्ये बॉम्ब ठेवल्याच्या खोट्या धमक्या देण्याच्या घटनांनी चिंताजनक स्वरूप धारण केले आहे. शेकडो लोकांचे दैनंदिन आयुष्य विस्कळीत होत आहे. उद्योगधंद्यांचे नुकसान होत आहे. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर अनावश्यक ताण पडत आहे. ही समस्या केवळ मस्करी किंवा अफवा म्हणून दुर्लक्षित करण्यासारखी नाही.

विमानतळ किंवा न्यायालयासारख्या ठिकाणी धमकी मिळाल्यानंतर संपूर्ण परिसर रिकामा करणे, बॉम्बशोधक पथक बोलावणे या सर्व प्रक्रियेला मोठा खर्च येतो. एका विमान उड्डाणाचा विलंब लाखो रुपयांचे नुकसान करतो. विमानतळावरील कामकाज ठप्प झाले, तर कोट्यवधींचे नुकसान होते. पोलिसांचा व सुरक्षा यंत्रणांचा वेळ वाया जातो. याचा फायदा गुन्हेगारांना होतो. बॉम्बची धमकी मिळाल्यावर शाळेतील मुले भयभीत होतात. पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण होते. शिक्षकांवर कमालीचा ताण पडतो. धमक्या खऱ्या समजून शाळा, कॉलेज रिकामी केली जातात. अलीकडे मुलांनी कॉलेजला जाणेच बंद केले आहे.

भारतात खोटी माहिती देणाऱ्या, सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्याविरुद्ध कायदे कडक हवे आहेत. आयपीसी, बीएनएसची कलमे लावून काही उपयोग होणार नाही. हा देश ज्यांना खिळखिळा करायचा आहे ते शत्रुराष्ट्राचे खरे हस्तक पकडले जात नाहीत. यावर कुणीही गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. खोट्या बॉम्बच्या धमक्या या आधुनिक काळातील एक धोकादायक प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीमुळे देशाची आर्थिक हानी तर सोडा, परंतु समाजाच्या मानसिक स्थैर्यावरही आघात करीत आहे.

कडक कायदे, सक्षम तंत्रज्ञान आणि सजग नागरिक या त्रिसूत्री’च्या बळावरच या समस्येवर नियंत्रण मिळवता येईल. खोटी धमकी देणे, अफवा पसरवणे हा राष्ट्रविघातक गुन्हा आहे. खोट्या अफवा किंवा धमक्यांमुळे लोकांच्या जीविताला धोका निर्माण होतो. भीती निर्माण करणे हे दहशतवाद्यांचे खरे ध्येय आहे. खोट्या धमक्यांचा विकृत खेळ थांबवायचा असेल तर आता राज्यकर्त्यांनी कठोर पावले उचलली पाहिजेत. आता कायद्याचा धाक दाखविण्याची खरी गरज आहे.

मध्यंतरी मुंबई पोलिसांच्या वाहतूक हेल्पलाइनवर (व्हॉटस्अॅप) एक संदेश आला होता, ‘१४ पाकिस्तानी अतिरेकी मुंबईत घुसले आहेत. त्यांच्या जवळ ४०० किलो आरडीएक्सचा साठा आहे. मुंबईतील १ कोटी लोकांना त्यांना मारायचे आहे. गणपती विसर्जनात १४ मानवी बॉम्ब पेरले आहेत.’ अशी धमकी त्या संदेशात देण्यात आली होती. पोलिसांनी धमकी देणाऱ्या गुन्हेगाराला उत्तर प्रदेशातील नोएडा येथून अटक केली. पुढे तो जामिनावर सुटला.

खोट्या कॉलमुळे विमान कंपन्यांचेही करोडोंचे नुकसान होत आहे. विमानात एका जिवंत महिलेच्या रूपाने मानवी बॉम्ब ठेवण्यात आला आहे अशी धमकी मिळाल्यावर विमान उडणार कसे? अशा धमक्या अधूनमधून विमान कंपन्यांना येतच असतात. भारतात तर आता हे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. घबराट निर्माण होत आहे. कर्मचाऱ्यांवर कामाचा जास्त ताण पडत आहे. खोटे कॉल्स करणाऱ्यांना दहशतवादीविरोधी कायद्यान्वये (UAPA) अटक केली पाहिजे, अशी मागणी विमान कंपन्यांकडून केली जात आहे. हे जर झाले नाही तर उद्या विमान व्यवसाय बंद होईल, असेही विमान कंपन्यांकडून बोलले जात आहे.

मुंबईत १९९२-९३ च्या जातीय दंगलीनंतर बॉम्बस्फोटाच्या धमक्या सुरू झाल्या, त्या अद्याप थांबलेल्या नाहीत. सुरुवातीला पाकिस्तानच्या आयएसआयच्या मुंबईतील हस्तकांकडून या धमक्या देण्यात येत होत्या. रॉनी मेन्डोंसा पोलीस आयुक्त असताना मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी २० पाकिस्तानी हेरांना अटक केली होती. परंतु त्यानंतर थेट बॉम्बस्फोट मालिकाच सुरू झाल्या. मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेसह २०११ पर्यंत पाचशेच्या वर निरपराध बॉम्बस्फोटात मारले गेले. २०११ नंतर मुंबईत बॉम्बस्फोट घडले नाहीत, परंतु धमक्या मात्र सुरूच आहेत. हे कधी बंद होणार? मुंबईतील गणेशोत्सव मिरवणुकीत पाकिस्तानी अतिरेक्यांचा बॉम्बस्फोट घडविण्याचा कट जुनाच आहे. २ ऑगस्ट १९९७रोजी गणेश विसर्जनात स्फोट घडविण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु पोलीस आयुक्त कार्यालयासमोरील मशिदीत बॉम्ब बनविणारा पाकिस्तानी अतिरेकीच बॉम्ब बनविताना स्फोट होऊन गंभीर जखमी झाला आणि त्याचा प्रयत्न फसला. मुंबई पोलिसांनी. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी याची गंभीर दखल घेऊन मुंबईतील पाक हस्तकांचा, गुप्तहेरांचा, बॉम्बच्या अफवा पसरविणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, नाहीतर ‘लांडगा आला रे आला’ ही बोधकथा प्रत्यक्षात खरी ठरली तर मुंबईत हाहाकार माजेल एवढे लक्षात ठेवा. बॉम्बस्फोटाच्या खोट्या धमक्या देणाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त होणे आवश्यक आहे.