
आखाती देशांमधील संघर्ष वाढत चालला आहे, अशातच आता अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली होती. अमेरिकेच्या लष्कराने जागतिक क्रूड ऑइलचा पुरवठा विस्कळीत होऊ नये म्हणून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका तेल जहाजाला संरक्षण दिले होते. याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर झाला. पण काही वेळातच त्यांनी आपली पोस्ट डिलिट केली आणि त्यानंतर व्हाईट हाऊसने स्पष्टीकरण देत असे कोणतेही संरक्षण दिले नसल्याचे म्हटले आहे. तर अमेरिकी नौदलाची होर्मुझ सामुद्रधुनीजवळ येण्याची हिंमत झाली नाही, असा दावा इराणकडून करण्यात आला आहे.
‘इराणविरुद्धच्या लष्करी कारवाया सुरू असताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प जागतिक ऊर्जेची स्थिरता राखत आहेत,’ असे राईट यांनी ‘X’ वरील आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते. त्यांनी पुढे म्हटले होते की, ‘जागतिक बाजारपेठेत तेलाचा पुरवठा सुरू राहावा यासाठी अमेरिकन नौदलाने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एका तेलवाहू जहाजाला सुरक्षा प्रदान केली’.
खरी घटना काय?
राईट यांच्या पोस्टनंतर तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. पण व्हाईट हाऊसने स्पष्ट केले की, अमेरिकेने होर्मुझच्या समुद्रधुनीतून कोणत्याही तेल टँकरला संरक्षण दिलेले नाही. जगातील सर्वात महत्त्वाच्या तेलवाहू मार्गांपैकी एक असलेल्या या सामुद्रधुनीतून जगातील २० टक्के तेल आणि मोठ्या प्रमाणावर एलएनजीचा पुरवठा होतो.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरॉलिन लीविट यांनी एका ब्रीफिंगमध्ये सांगितले की, ‘मी पुष्टी करू शकते की अमेरिकन नौदलाने सध्या कोणत्याही टँकरला किंवा जहाजाला सुरक्षा दिलेली नाही, जरी भविष्यात तो एक पर्याय असू शकतो.’
दुसरीकडे, इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’ने म्हटले की, अमेरिकेच्या कोणत्याही नौदलाच्या जहाजाची होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ येण्याची ‘हिंमत’ झालेली नाही. त्यांनी ख्रिस राईट यांचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे म्हटले. ऊर्जा विभागाच्या प्रवक्त्याने एएफपीला सांगितले की, ‘ऊर्जा विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून व्हिडिओला चुकीचे कॅप्शन देण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर सचिव राईट यांच्या अधिकृत खात्यावरून तो व्हिडिओ हटवण्यात आला.’
१ ते १० मार्च दरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीत किंवा आसपास किमान १० तेल जहाजांवर हल्ले झाले किंवा तशा घटनांची नोंद झाली, अशी माहिती ‘यूके मॅरिटाइम ट्रेड ऑर्गनायझेशन’ (UKMTO) आणि आयएमओने दिली आहे.
किमतींमधील चढ-उतार
ट्रम्प प्रशासन पर्शियन गल्फमध्ये अडकलेले लाखो बॅरल तेल बाहेर काढण्यासाठी काय प्रयत्न करत आहे, याकडे जागतिक बाजारपेठेचे लक्ष लागले आहे. इराण युद्ध सुरू झाल्यानंतर होर्मुझमधील जवळपास सर्व व्यावसायिक व्यापार सुरक्षेच्या कारणास्तव ठप्प झाला आहे. यामुळे टँकर्स बाहेर पडू शकले नाहीत, पर्यायाने साठवणूक क्षमता संपली असून उत्पादकांनी उत्पादनात मोठी कपात केली आहे.
सौदी अरेबिया, कुवेत, इराक आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या देशांकडून दररोज लाखो बॅरल कमी तेल काढले जात असल्याने, हा जलमार्ग पुन्हा सुरू करणे अत्यंत निकडीचे झाले आहे. मात्र, जोपर्यंत युद्ध सुरू आहे तोपर्यंत आखातातून कोणतीही निर्यात होऊ देणार नाही, अशी शपथ तेहरानने मंगळवारी घेतली आहे. युद्धापूर्वी या मार्गावरून दररोज सरासरी १३८ जहाजे जात असत.
इराणी जहाज बुडवताना मला खूप आनंद होतो! ट्रम्प यांना राक्षसी आनंद… 20 पट हल्ले वाढवू
युद्धाच्या सुरुवातीपासून ट्रम्प प्रशासनाने जागतिक बाजारपेठेला दिलासा देण्यासाठी शिपिंग कंपन्यांना विमा संरक्षण आणि नौदलाची सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे कच्च्या तेलाचे दर सोमवारी ३० टक्क्यांनी वधारून १२० डॉलरवर पोहोचले होते आणि नंतर पुन्हा खाली आले. ट्रम्प यांनी युद्ध लवकर संपण्याचे संकेत दिल्यानंतर किमती पुन्हा घसरल्या, मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांच्या संरक्षण सचिवांनी इराणवर आतापर्यंतचा ‘सर्वात तीव्र हल्ला’ करण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण इराणशी चर्चेसाठी तयार आहोत असे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. तसेच एका सर्वेक्षणानुसार अमेरिकी नागरिकांनी इराणवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात मत नोंदवले असून अमेरिकेवर दहशतवादी हल्ल्याची भीती त्यांना वाटत असल्याचे मत नोंदवले आहे.
























































