
दुसऱ्या ऑल इंडिया पोलीस क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पोलीस संघाने दमदार कामगिरी करत अंतिम सामन्यात आरपीएफला नमवत विजेतेपद पटकावले. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या लढतीत महाराष्ट्राने 20 षटकांत 251 धावांचा डोंगर रचत आपले जेतेपद निश्चित केले होते.
कर्णधार सुनील पाटील, रोहित पोळ, योगेश पाटील, श्रीकांत लिंबोळे आणि योगेश शिंदे यांच्या धडाकेबाज फलंदाजीने महाराष्ट्राची धावगती वेगाने उसळली. 251 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरपीएफची सुरुवात चांगली झाली, मात्र रोहित बेहेरेच्या भेदक गोलंदाजीने सामना महाराष्ट्राच्या बाजूने झुकला. बेहेरेने पाच विकेट घेत प्रतिस्पर्ध्यांचा डाव उद्ध्वस्त केला तर योगेश शिंदेने त्याला भक्कम साथ दिली. महाराष्ट्राचा कर्णधार सुनील पाटील स्पर्धेतील ‘सर्वोत्तम खेळाडू’ ठरला, तर अंतिम सामन्यात रोहित बेहेरेने ‘सामनावीरा’चा मान मिळवला.
महाराष्ट्र पोलीस संघाच्या यशाबद्दल पोलीस महासंचालक सदानंद दाते, अतिरिक्त महासंचालक मधुकर पांडे, पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश आणि प्रवीण पडवळ यांनी अभिनंदन केले. प्रशिक्षक रोहन बगाडे, संदेश चव्हाण तसेच निवड समितीचे संतोष कांबळे, एमसीएचे दीपक पाटील आणि नीलेश भोसले यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.





























































