
प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीतील बळीराम सावंत क्रीडानगरी येथे रंगलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी स्पर्धेच्या दुसऱया दिवशीही थराराने अक्षरशः उकळी घेतली. चढाई-पकडींच्या स्पह्टक लढती, शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेली झुंज आणि काही संशयास्पद समझोता सामन्यांमुळे कबड्डीप्रेमींना रोमांचक तसेच वादग्रस्त अनुभवाची मेजवानी मिळाली.
दिवसातील सर्वात नाटय़मय लढत ठरली ती वाघजाई क्रीडा मंडळ आणि शिवनेरी सेवा मंडळ यांच्यातील. एकवेळ 10-29 अशा मोठय़ा फरकाने पिछाडीवर असलेला शिवनेरीचा संघ पराभवाच्या दारात उभा होता. मात्र त्याक्षणी मैदानात उतरलेल्या जतिन विंदेने जणू वादळच उठवले. त्याच्या सुसाट चढायांनी वाघजाईच्या भक्कम बचावाला छेद दिला आणि गमावलेला सामना 39-39 असा बरोबरीत खेचून आणत वाघजाईच्या तोंडचा विजयाचा घास हिसकावून घेतला.
सुरुवातीला मात्र वाघजाईने अक्षरशः धडाकेबाज सुरुवात केली होती. ओमकार पुंभार आणि शुभम शिंदे यांच्या आक्रमक खेळामुळे पहिल्याच दहा मिनिटांत 20-3 अशी आघाडी घेत सामना जवळपास एकतर्फी केला होता. मध्यंतरालाही वाघजाई 29-18 अशी भक्कम आघाडीवर होती. पण मध्यंतरानंतर जतिन विंदेने एकहाती झुंज देत तब्बल 15 चढायांचे गुण मिळवले आणि सामना पलटवला. अखेरीस हा थरार 39-39 अशा बरोबरीत सुटला. या लढतीत जतिनने 21 गुणांची कमाई करत वाघजाईला जबर धक्का दिला.
दुसऱया एका रंगतदार सामन्यात नांदेडच्या मिडलाईन अॅपॅडमी आणि नवोदित यांच्यातील झुंज 40-40 अशी बरोबरीत सुटली. विजय क्लबने मात्र आपली ताकद दाखवत विजय नवनाथ संघाला 43-27 असे सहज नामोहरम केले तर वाघजाईने जयभारतचा 40-16 असा धुव्वा उडविला.
कबड्डीचा रंग की फिक्सिंगचा डाव?
गटात पहिले-दुसरे स्थान सुरक्षित करण्यासाठी काही लढती मुद्दाम रंगवण्यात आल्या होत्या, असा संशय प्रेक्षकांनी व्यक्त केला. स्वस्तिक क्रीडा मंडळ आणि मिडलाईन यांच्यातील सामन्यात मध्यंतराला मिडलाईन 8-7 अशी आघाडीवर होती, मात्र अखेरीस सामना 18-17 अशा एका गुणाच्या फरकाने संपला. त्यानंतर स्वस्तिक आणि नवोदित यांच्यातील सामना 13-13 असा बरोबरीत सुटल्याने प्रेक्षकांच्या शंका आणखी गडद झाल्या. कबड्डीतल्या फिक्सिंगला समझोता लढतींचे नाव देण्याची परंपरा हल्ली झपाटय़ाने वाढतेय. पण अशा सामन्यांकडे संघटना आणि आयोजक कानाडोळा करत असल्याचे दिसतेय. अशा फिक्सिंग करणाऱया संघांना जोपर्यंत थेट स्पर्धेतून बाद करण्याचे धाडस संघटना आणि आयोजक दाखवत नाहीत तोपर्यंत हा समझोता थांबणार नाही.





























































