Maharashtra Budget 2026 – नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी कठोर कायदा करा, मिलिंद नार्वेकर यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोवंडी, मानखुर्दसह दाट लोकवस्तीच्या भागात नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. या टोळ्या खासगी आणि शासकीय प्रसूतिगृहांमधून गर्भवती महिलांची तसेच आयव्हीएफ केंद्रातून अपत्य न होणाऱ्यांची माहिती मिळवतात. रुग्णालयाच्या स्टाफही यात सहभागी असतो. त्यानंतर आई-वडिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांना नवजात बालकाची विक्री करण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे रेजिस्ट्रेशन सिक्रसीबाबत निर्बंध आणावे, अशी मागणी शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी केली.

गोवंडी, मानखुर्द परिसरात नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. या टोळ्यांवर कोणती कारवाई केली आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी सरकार काय पावले उचलणार याबाबत आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, शासकीय प्रसूतिगृहातील नोंदणीबाबत गुप्तता राखण्याची सूचना संबंधित विभागाला दिली जाईल तसेच यासंदर्भात पोर्टलदेखील निर्माण करू. आयव्हीएफ सेंटरमध्येदेखील नोंदणीच्या बाबतीत गुप्तता ठेवण्याचे निर्देश दिले जातील.

या प्रकरणात एखाद्याला अटक झाली तरी त्याचे कुटुंबीय हे काम सुरू ठेवतात. त्यामुळे एखादा कायदा आणून संपूर्ण कुटुंबावर कडक कारवाई करता येईल का, अशी मागणी आमदार मिलिंद नार्वेकर यांनी केली. त्यावर अशा प्रकरणात कुटुंबाचा थेट संबंध असेल तर कायद्याचा अभ्यास करून कुटुंबावर कारवाई करू, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले.