
राजधानी दिल्लीत मेट्रोची सेवा पुन्हा कोलमडली आहे. चार दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या दिल्ली मेट्रोच्या नवीन कॉरिडॉरला पुन्हा एकदा केबल चोरांनी लक्ष्य केले आहे. दीपाली चौक ते मजलिस पार्क या 9.9 किलोमीटर लांबीच्या नवीन मार्गावर तब्बल 1000 मीटर सिग्नल केबलची चोरी झाली आहे.याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला घटनास्थळावरून ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
दिल्ली मेट्रोच्या दीपाली चौक ते मजलिस पार्क या स्थानकादरम्यान झालेल्या केबल चोरीमुळे या मार्गावरील सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला आहे. परिणामी मेट्रोची गती मंदावली. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भलस्वा ते मजलिस पार्क दरम्यान गाड्यांचा वेग ताशी 25 किलोमीटरपर्यंत मर्यादित ठेवण्यात आला होता. धावत्या मेट्रोच्या वेळेत नवीन केबल टाकणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्यामुळे गुरुवारी दिवसभर या मार्गावरील प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागला. दरम्यान मेट्रोसेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आहे.
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (DMRC) दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दुरुस्तीचे काम रात्रीच्या वेळी, म्हणजेच मेट्रोची सेवा बंद झाल्यानंतर हाती घेतले जाईल. तोपर्यंत प्रवाशांना माहिती देण्यासाठी स्थानकांवर आणि ट्रेनमध्ये सतत घोषणा केल्या जात आहेत. सुरक्षितता आणि वेळेचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.






















































