
इस्रायल इराण युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजी सिलिंडर बुकिंगमधील किमान अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरांमध्ये बुकिंगमधील किमान कालावधी 21 दिवसांवरून 25 दिवस करण्यात आला असून ग्रामीण आणि दुर्गम भागात तो 25 दिवसांवरून 45 दिवस करण्यात आला आहे. ही माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह यांनी गुरुवारी लोकसभेत दिली.
पुरी म्हणाले, “मागणी व्यवस्थापनासाठी शहरांमध्ये किमान 25 दिवसांचे आणि ग्रामीण तसेच दुर्गम भागांमध्ये 45 दिवसांचे बुकिंग अंतर निश्चित करण्यात आले आहे.”
जागतिक परिस्थितीचा परिणाम
जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः जगातील महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या होमुर्झच्या सामुद्रधुनीत झालेल्या हल्ल्यांनंतर ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
सिलिंडर वितरण वेळेत बदल नाही
दरम्यान, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या वितरण वेळेत कोणताही बदल झालेला नाही. बुकिंगपासून सिलिंडर मिळेपर्यंतचा सरासरी कालावधी अजूनही अडीच दिवस इतकाच असल्याचे पुरी यांनी स्पष्ट केले.
रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांना प्राधान्य
रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांना एलपीजी पुरवठ्यात प्राधान्य दिले असून त्यांचा पुरवठा अखंडित राहील, असेही त्यांनी सांगितले.
घबराटीतून जादा बुकिंग
काही भागांत घबराटीतून मोठ्या प्रमाणावर सिलिंडर बुकिंग होत असल्याचेही सरकारच्या निदर्शनास आले आहे. वितरक आणि विक्रेत्यांच्या स्तरावर साठेबाजी होत असल्याच्या तक्रारी मिळाल्या असल्याचे पुरी यांनी सांगितले.
त्यांच्या मते, सध्या निर्माण झालेली परिस्थिती प्रत्यक्ष तुटवड्यामुळे नसून ग्राहकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीमुळे आहे. “काही भागांमध्ये बुकिंगची वाढ ही उत्पादन किंवा पुरवठ्याच्या अपयशामुळे नसून मागणीतील विकृतीमुळे झाली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ओटीपी प्रणालीचा विस्तार
सिलिंडर वितरणावर अधिक नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार वितरण प्रमाणीकरण कोड प्रणालीचा विस्तार करत आहे. सध्या 50 टक्के ग्राहकांसाठी असलेली ही व्यवस्था वाढवून 90 टक्के ग्राहकांपर्यंत नेण्यात येणार आहे.
या प्रणालीअंतर्गत ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर आलेला एकवेळ वापराचा कोड (ओटीपी) दिल्यानंतरच सिलिंडर वितरित झाल्याची नोंद केली जाईल. त्यामुळे अनधिकृत वळवणूक लपवणे जवळपास अशक्य होईल, असे पुरी यांनी स्पष्ट केले.
























































