
मध्य पूर्वेतील तणाव आता टोकाच्या पातळीवर पोहोचला असून, इराणने तुर्कीये येथील अमेरिकेच्या इन्सिर्लिक (Incirlik) एअर बेसला लक्ष्य केले आहे. या हवाई तळावर अमेरिकेची अण्वस्त्रे तैनात असल्याचे मानले जाते. या हल्ल्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून नाटो (NATO) देशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे ३:२५ च्या सुमारास तुर्कीयेमधील अडाना शहरात सायरनचा आवाज ऐकू आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. इन्सिर्लिक एअर बेसवर तातडीने रेड अलर्ट जारी करण्यात आला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशात आगीच्या गोळ्याप्रमाणे काही वस्तू वेगाने जाताना दिसल्या, ज्या इराणकडून डागलेली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे असल्याचे सांगण्यात येत आहे.
इराणने या तळाच्या दिशेने ३ ते ४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती, असे बोलले जात आहे. मात्र इन्सिर्लिक तळावर तैनात असलेल्या नाटोच्या प्रगत हवाई संरक्षण प्रणालीने (Air Defense System) ही क्षेपणास्त्रे लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच हवेत नष्ट केली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे अद्याप वृत्त नाही, मात्र तळाला मोठा धोका निर्माण झाला होता.
दरम्यान, इन्सिर्लिक एअर बेस हा नाटोचा सर्वात महत्त्वाचा तळ असून येथे अमेरिकेचे B61 हे अणू बॉम्ब ठेवले जातात. इराणने थेट या तळाला लक्ष्य केल्यामुळे हा हल्ला केवळ अमेरिकेवर नसून नाटोवरही असल्याचे मानले जात आहे. गेल्या काही दिवसांत इराणने अमेरिका आणि इस्रायलच्या विविध ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यांमधील हा सर्वात मोठा आणि धोकादायक हल्ला मानला जात आहे.
या हल्ल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव अमेरिकेने अडाना येथील आपले दूतावास बंद केले आहे. तसेच तुर्कीयेमध्ये असलेल्या सर्व अमेरिकन नागरिकांना तातडीने देश सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तुर्कीये सरकारनेही इराणला अशा प्रकारचे प्रक्षोभक पाऊल न उचलण्याचा इशारा दिला आहे.
























































