
सध्या वाढत्या तापमानामुळे कडक उन्हाचा त्रास जोरदार सोसावा लागत आहे. अशा परिस्थितीत शरीराची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे उलटी, चक्कर, थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात पुरेसे पाणी पिणे आणि योग्य आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे.
तज्ज्ञांच्या मते, उष्णतेच्या लाटेचा धोका टाळण्यासाठी शक्यतो दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे. तसेच शरीर हायड्रेट राहण्यासाठी काही थंड आणि पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.
कोणते पदार्थ आहारात समाविष्ट करायला हवेत
टरबूज हे उन्हाळ्यातील सर्वात लोकप्रिय फळ मानले जाते. यात फायबर, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ए, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक असतात. टरबूज खाल्ल्याने शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते आणि शरीराला थंडावा मिळतो.
संत्र्यामध्ये सुमारे ८८ टक्के पाणी असते. तसेच व्हिटॅमिन-सी, कॅल्शियम आणि फायबर यांचा चांगला स्रोत असल्याने उन्हाळ्यात संत्रे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
उन्हाळ्यात दही खाणे शरीरासाठी खूप उपयुक्त असते. दह्यामध्ये सुमारे ८५ टक्के पाणी असते आणि त्यात प्रोबायोटिक्सही असतात, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात.
काकडी ही शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्सिफायर मानली जाते. काकडी खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते आणि शरीराला ताजेपणा मिळतो.
नारळ पाणी हे उन्हाळ्यातील उत्तम नैसर्गिक पेय आहे. यात असलेले खनिजद्रव्ये शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करतात आणि शरीराला ऊर्जा देतात.
उन्हाळ्यात दररोज किमान ७ ते ८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. घराबाहेर पडताना पाणी पिऊनच बाहेर पडावे आणि सोबत पाण्याची बाटली ठेवावी.
लिंबूपाणी हे उन्हाळ्यातील अत्यंत लोकप्रिय पेय आहे. हे शरीराला थंडावा देऊन डिहायड्रेशनपासून संरक्षण करते.



























































