
स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषक राज्यस्तरीय स्थानिक पुरुष कबड्डी स्पर्धेत पहिल्या दिवसापासून धडाकेबाज खेळ करणार्या नाशिकच्या ब्रम्हा स्पोर्ट्स क्लब आणि रत्नागिरीच्या वाघजाई क्रीडा मंडळाने दिमाखदार विजयासह उपांत्य फेरी गाठली. तसेच मुंबई शहरच्या एसएसजी फाऊंडेशन आणि उपनगरच्या पार्ले महोत्सव स्पोर्ट्स अॅकॅडमीच्या संघांनीही जोरदार खेळ करत अंतिम चार संघात आपले स्थान पक्के केले. आता अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी ब्रम्हा विरुद्ध पार्ले महोत्सव आणि वाघजाई विरुद्ध एसएसजी अशा उपांत्य लढती खेळल्या जाणार आहेत. दोन्ही लढतीतील विजयी रात्री उशीरा जेतेपदासाठी एकमेकांशी भिडतील.
प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीतील बळीराम सावंत क्रीडानगरीत इंडियन ऑइल, एलआयसी, मुथुट फायनान्स आणि सारस्वत बँक यांच्या पुरस्कारान सुरु असलेल्या कबड्डीच्या थरारात मुंबई बाहेरील संघांसमोर मुंबई शहरच्या संघाचा निभाव लागू शकला नाही. स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून सुसाट असलेल्या ब्रम्हा स्पोर्ट्स क्लबने विजय क्लबचा अक्षरशा धुव्वा उडवत उपांत्य फेरी गाठली. या अत्यंत निरसवान आणि एकतर्फी सामन्यात प्रफुल झवरे, आकाश शिंदे, स्वयम मालोदे, रत्नेश पाटील यांच्या चढाई-पकडींच्या वेगवान खेळाने २९-११ अशी आघाडी घेत आपला विजय निश्चित केला. त्यानंतर हार मानलेल्या विजय क्लबने सामना वेळेआधी संपवण्यातच धन्यता मानली आणि २० मिनीटांचा खेळ दहा मिनीटातच संपवत ब्रम्हाने ३८-११ फरकाने उपांत्य फेरीत स्थान मिळवले.
दुसर्या उपांत्यपूर्व सामन्यात अभिषेक भोजने, अजिंक्य पवार, शुभम शिंदे आणि साईराज कुंभार यांच्या झंझावाताने गोल्फादेवी स्पोर्ट्स क्लबची धुळधाण उडवत लढत जिंकली. मध्यंतरालाच २१-११ अशी आघाडी घेतल्यानंतर वाघजाईच्या खेळापुढे गोल्फादेवीचा संघ अत्यंत कमकुवत भासला आणि वाघजाईने ४०-१५ अशा जोरदार विजयासह आपली घोडदौड उपांत्य फेरीत नेली.
आजचा थरारक संघर्ष पाहायला मिळाला तो अंकूर स्पोर्ट्स क्लब आणि एसएसजी फाऊंडेशन यांच्यात. सुशांत साईल आणि सुरज दाबेकर यांच्या आक्रमक खेळाने अंकूरला पहिल्या दहा मिनीटातच १४-३ अशी जोरदार सुरुवात दिली होती. मध्यंतरालाही अंकूर २४-१३ असा आघाडीवर होता. मात्र उत्तरार्धात प्रो सुपरस्टार पंकज मोहितेने सारा खेळच बदलवून टाकला. त्याने एकापोठापाठ एक अशा भन्नाट चढाया करत एसएसजीला पहिल्या दहा मिनीटातच ३२-२४ अशी आघाडी मिळवून देत सारा खेळच बदलून टाकला. ११ गुणांनी पिछाडीवर पडलेल्या एसएसजीने १९ गुणांची कमाई करत सामना आपल्या हातात घेतला. पंकजने वन मॅन आर्मीसारखा खेळ करत ४२-२९ अशा फरकाने उपांत्य फेरी गाठली. त्याने चक्क १६ गुण मिळवत आपली दहशत दाखवली. दुसरीकडे अक्षय तावडेच्या १४ गुणांनी पार्ले महोत्सव स्पोर्ट्स अॅकॅडमीला ३७-२८ असा सहज मिळवून दिला. स्वस्तिककडून अमित चव्हाण आणि अशोक विटकरने पार्ले महोत्सव संघाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला.



























































