
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या पदावरून हटवण्याच्या प्रस्तावासाठी विरोधी पक्षांनी शुक्रवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये, लोकसभा आणि राज्यसभेत नोटीस सादर केली आहे. २०० हून अधिक खासदारांनी या सूचनेवर स्वाक्षरी केली आहे, असे बोलले जात आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निष्पक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधकांनी त्यांना पदावरून हटवण्याची मागणी लावून धरली आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, १३० लोकसभा खासदार आणि ६३ राज्यसभा खासदारांनी या सूचनेवर स्वाक्षरी केली आहे. नियमांनुसार, मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याच्या सूचनेसाठी किमान १०० लोकसभा खासदार आणि ५० राज्यसभा खासदारांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक असतात.
दरम्यान, संसदेच्या चालू अधिवेशनात या मुद्द्यावरून मोठा गदारोळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विरोधकांनी आरोप केला आहे की, लोकशाहीच्या रक्षणासाठी निवडणूक आयोगासारख्या संस्थांनी कोणत्याही दबावाशिवाय काम करणे गरजेचे आहे, मात्र सध्याच्या परिस्थितीत त्यामध्ये त्रुटी दिसून येत आहेत. आता या नोटिसीवर सभापती आणि अध्यक्ष काय निर्णय घेतात आणि त्यावर सभागृहात चर्चा होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी पक्षाने मात्र हे आरोप फेटाळून लावले असून निवडणूक आयोग आपली जबाबदारी चोख बजावत असल्याचे म्हटले आहे.

























































