
घरातून निघून गेलेल्या १७ वर्षीय मुलीचा शोध घेत आई बुलढाणा जिल्ह्यातील धावडा येथे पोहोचली. मुलीला परत घरी आणत असताना बस अडवून एका तरुणाने आईसमोरच मुलीला पुन्हा जबरदस्तीने घेऊन पळून गेला. ही घटना ११ मार्च २०२६ रोजी न्यायनगरात उघडकीस आली. धावडा येथील आर्यन राजू साबळे असे मुलीला पळविणाऱ्याचे नाव असून, त्याच्याविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी १७ वर्षे १६ दिवसांच्या पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली. त्यानुसार, १७ वर्षीय पीडिता ही ११ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी घरातून कोणालाही न सांगता निघून गेली होती. कुटुंबीयांनी तिचा मित्र-मैत्रिणी, नातेवाईक तसेच परिसरात शोध घेतला; मात्र ती सापडली नव्हती. जवळपास तीन महिन्यांनंतर १० मार्च २०२६ रोजी सकाळी पीडित मुलीने आईला फोन करून ती बुलढाणा जिल्ह्यातील धावडा येथे असल्याचे सांगितले. तसेच ती आर्यन राजू साबळे याच्यासोबत असल्याचेही तिने कळवले.
मुलीचा फोन आल्यानंतर आई धावडा येथे गेली. तेथे मुलगी आर्यन साबळे यांच्या घरी असल्याचे समोर आले. दुसऱ्या दिवशी आई मुलीला घेऊन बसने छत्रपती संभाजीनगरकडे निघाली. मात्र, धावडा फाटा येथे बस येताच आर्यन साबळे याने बससमोर उभे राहून बस थांबवली. त्यानंतर आई-मुलीला खाली उतरवून मुलीला पुन्हा जबरदस्तीने त्याच्यासोबत घरी घेऊन गेला. तेथून तो पुन्हा पीडित मुलीला घेऊन पळून गेला. घटनेनंतर महिलेने तात्काळ ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. या घटनेनंतर महिलेने पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आर्यन साबळे याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अर्जुन राऊत करीत आहेत.




























































