नाशिकच्या ब्रम्हाचा धुव्वा उडवत राजाभाऊ देसाई चषकावर रत्नागिरीच्या वाघजाईने कोरले नाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषक राज्यस्तरीय स्थानिक पुरुष कबड्डी स्पर्धेत मुंबईचे १४ तगडे संघांना मागे टाकत रत्नागिरीच्या वाघजाई क्रीडा मंडळाने बाजी मारत स्पर्धाच नव्हे तर मुंबईकरांची मनंसुद्धा जिंकली. मुंबईच्या या प्रतिष्ठित स्पर्धेची अंतिम लढत वाघजाई आणि नाशिकच्या ब्रम्हा स्पोर्ट्स क्लब या संघात झाली आणि पहिल्या सामन्यापासून सुसाट आणि भन्नाट खेळ करणार्‍या वाघजाईने पहिल्या पाच मिनीटातच आपणच जिंकणार असा खेळ करत अंतिम सामन्यातल्या थरारालाच पळवून लावले. अत्यंत एकतर्फी झालेल्या या सामन्यात अजिंक्य पवारच्या पावरफुल्ल चढायांमुळे वाघजाईने ब्रम्हाचे आव्हान ३९-१६ असे उधळून लावत अजिंक्यपद पटकावले. अजिंक्यच या दिमाखदार स्पर्धेचा मानकरी ठरला.

आज प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत उभारलेल्या बळीराम सावंत क्रीडानगरीत कबड्डीचा प्रचंड आवाज घुमला. गेले चार दिवस इंडियन ऑइल, एलआयसी, सारस्वत बँक, मुथुट फायनान्स यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या स्पर्धेत कबड्डीप्रेमींना कबड्डीचा रांगडा थरार “याची देही याची डोळा” अनुभवता आला होता. आजही तो थरार कायम राहिल या अपेक्षेने तब्बल पाच हजार कबड्डीप्रेमींनी गर्दी केली,पण स्पर्धेतील दोन्ही उपांत्य सामने आणि अंतिम सामनाही एकतर्फी झाला. मुंबईच्या पार्ले महोत्सव स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीपाठोपाठ एसएसजी फाऊंडेशननेही घोर निराशा केली.

एकतर्फी लढतींमुळे आधीच निराश झालेल्या कबड्डीप्रेमींना अंतिम फेरीत रत्नागिरी आणि नाशिकच्या संघांकडून थरारक शेवटाची अपेक्षा होती. पण थरारक सिनेमाचा शेवट आधीच कळल्यावर जसा सिनेप्रेमींचा अपेक्षाभंग होतो, तसाच अपेक्षाभंग कबड्डीप्रेमींचा झाला. पहिल्या पाच मिनीटात लोण चढवत वाघजाईने घेतलेल्या २०-९ या आघाडीने सामन्याचे चित्र जवळजवळ स्पष्ट केले होते आणि तसेच घडले. अजिंक्य पवारच्या आक्रमक खेळाने वाघजाईला अजिंक्यपदाचा करंडकच आधीच बहाल केला होता. ब्रम्हा स्पोर्ट्स क्लबचा आकाश शिंदे, वैभव कांबळे, रत्नेश पाटील तसेच अन्य एकाही खेळाडूला वाघजाईशी संघर्षही करता आला नाही. त्यामुळे मध्यंतराला वाघजाईने २५-९ अशी आघाडी घेत सामनाच संपवला होता. उत्तरार्धात ब्रम्हाच्या खेळाडूंनी केवळ हरण्याची औपचारिकता पूर्ण केली आणि वाघजाईने जेतेपदाच्या थाटात त्यावर शिक्कामोर्तब केले. अजिंक्यने चढाईचे दहा गुण मिळवत आपला दबदबा अंतिम फेरीतही दाखवला. तोच मालिकावीरही ठरला. त्यांचाच शुभम शिंदे सर्वोत्तम पकडवीर तर ब्रम्हाच्या आकाश शिंदेला सर्वोत्तम चढाईवीराचा मान मिळाला. अक्षय तावडेला सर्वोत्तम उपयुक्त खेळाडूचा पुरस्कार लाभला.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा महेश सावंत, सुनील शिंदे, मनोज जामसुतकर, अनंत नर आणि हारुन खान या आमदारांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी माजी महापौर श्रद्धा जाधव, सोनम जामसुतकर, निशिकांत शिंदे या नगरसेवकांसह मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

उपांत्य फेरीत वाघजाईचाच आवाज

मुंबईच्या एसएसजी फाऊंडेशनकडे पंकज मोहिते, आशिष चौधरीसारखे दिग्गज चढाईवीर असल्यामुळे वाघजाईला हे आव्हान झेपणार नाही, असे बोलले जात होते. पण ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ या म्हणीप्रमाणे एसएसजीने माती खाल्ली. अजिंक्य पवारने जोरदार आणि दमदार चढायांचा हल्ला करत मध्यंतरालाच २८-१७ अशी निर्णायक आघाडी घेत सामना वाघजाईच्या बाजूने झुकवला होता. पंकज मोहितेने काही भन्नाट चढाया करत संघात जान फुंकण्याचा प्रयत्न केला, पण वाघजाईच्या खेळाडूंना त्यांचे खेळाडू आव्हानच देऊ शकले नाही आणि सामना ५०-२६ अशा फरकाने वाघजाईने जिंकला. एकट्या अजिंक्यने १७ चढाईचे आणि दोन पकडीचे गुण मिळवले. दुसरा उपांत्य सामना आकाश शिंदेच्या सुपरडुपर चढायांनी एकहाती जिंकवला. २४ चढायांचे गुण मिळवत ब्रम्हा स्पोर्ट्स क्लबने पार्ले महोत्सव अ‍ॅकॅडमीची ४३-२२ अशी धुळधाण उडवली. पार्ले महोत्सवकडून अक्षय तावडेने जोरदार खेळ केला, पण तो पुरेसा नव्हता.