
प्रभू श्रीरामांची अयोध्या नगरी पुन्हा एकदा सुवर्ण क्षणांची साक्षीदार होण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या 19 मार्च रोजी म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर राममंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या गर्भगृहात श्रीराम यंत्राची विधीवत स्थापना केली जाणार आहे. त्यासाठी नऊ दिवसीय अनुष्ठान सुरू झाले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल. श्रीराम यंत्र गेली दोन वर्षे मंदिर परिसरात सुरक्षित ठेवून त्याची पूजा केली जात होती.
श्रीराम यंत्र स्थापना विधीची सुरुवात भव्य कलश यात्रा काढून झाली. विधीसाठी देशभरातून 51 विद्वान पंडितांना बोलावण्यात असून तिथे नऊ कुंडीय हवन आणि विशेष पूजन केले जाणार आहे.
सोहळ्याचे वैशिष्टय़ म्हणजे ज्या कामगारांनी रात्रंदिवस राबून भव्य मंदिर साकारले, त्यांचाही गौरव केला जाणार आहे. सुमारे 1800 मजूर आणि 300 संस्थांच्या प्रतिनिधींना या कार्यक्रमासाठी खास निमंत्रण देण्यात आले आहे. केरळच्या प्रसिद्ध आध्यात्मिक गुरुमाता अमृतानंदमयी यासुद्धा आपल्या 1200 अनुयायांसह अयोध्येत दाखल होणार आहेत. धार्मिक कार्यक्रमाचे नेतृत्व राम मंदिर ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा करत आहेत. नऊ दिवसांच्या अनुष्ठानची सुरुवात झाली आहे. येत्या दिवसांत यज्ञशालेत नऊ कुंडीय हवन, विशेष पूजा आणि अनेक वैदीक अनुष्ठान आयोजित केले जातील. त्यामध्ये रामभक्त सहभागी होतील. या ऐतिहासीक कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण दूरदर्शनवर केले जाईल.

























































