
गॅसटंचाई शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात पोहोचली आहे. श्री साई संस्थान प्रशासनाने गॅस बचतीसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार, आता साईभक्तांना दर्शनानंतर फक्त प्रसादाचा एकच लाडू देण्यात येणार आहे. तसेच साई प्रसादालयाच्या भोजन मेनूतही बदल करण्यात आला आहे. भाविकांना आता एक भाजी, चपाती आणि खिचडी, असा साधा प्रसाद भोजन मिळणार असल्याचे संस्थानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रसाद भोजन तयार करताना साई संस्थानचा सोलर प्लांटही मोठा आधार ठरत असून, त्याचा अधिकाधिक वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संस्थानकडे सध्या सुमारे वीस दिवस पुरेल इतकाच गॅससाठा शिल्लक असल्याने गॅसची काटकसर करण्यासाठी निर्णय तातडीने लागू करण्यात आले आहेत.





























































