
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, यूपीआय व्यवहार स्वीकारणारी ही देशातील पहिली व एकमेव राज्य बँक ठरली आहे. सध्या अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आणि नागरी सहकारी बँकांना यूपीआय सेवा घेण्यासाठी व्यापारी बँकांवर अवलंबून राहावे लागते. यापुढे मात्र राज्य बँकेने ‘यूपीआय स्वीकारणारी बँक’ हा दर्जा प्राप्त केल्याने सहकार क्षेत्रातील आर्थिक व्यवहार यापुढे सहकार व्यवस्थेच्या अंतर्गतच सुरक्षित राहतील.
सहकारातील यासह इतर सर्व संस्थांना आधुनिक डिजिटल पेमेंट प्रणालीशी जोडण्यासाठी आणि त्यांचे बँकिंग व्यवहार अधिक वेगवान करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ‘एअरपे’ या टेक्नॉलॉजी कंपनीबरोबर सहयोग करार करत स्वतंत्र यूपीआय स्वीकारकर्ता बँक म्हणून सेवा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने स्वतःचे यूपीआय हॅण्डल राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँका, नागरी सहकारी बँका व विविध कार्यकारी संस्थांबरोबरच दूध संघ, साखर कारखाने व सहकारातील इतर सर्व संस्थांना देण्याचे ठरविल्याने या संस्थांना पेमेंट कलेक्शनसाठी आता शिखर बँकेचे
upi@mscbank हे अधिकृत यूपीआय हॅण्डल वापरता येणार आहे.
शेतकऱ्यांना आधुनिक बँकिंग सेवा मिळणार
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सुरू केलेल्या या सेवेमुळे राज्याचे सहकार क्षेत्र अधिक डिजिटल सक्षम होईल व सदर प्रणाली अधिक स्वावलंबी होईल. सहकारी संस्थांचे आर्थिक व्यवहार जलद होण्याबरोबरच त्यामध्ये अधिक पारदर्शकता येईल व सहकारावरील विश्वास वाढीस लागेल. डिजिटल युगात ग्रामीण भागातील सभासद आणि शेतकऱ्यांना आधुनिक बँकिंग सेवा प्रदान करण्याच्या दिशेने पडलेले हे योग्य पाऊल आहे, असा विश्वास प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केला.
























































