
अमेरिका-इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या टंचाईमुळे गॅस सिलिंडरसाठी सर्वत्र रांगा लागलेल्या आहेत. हॉटेल- पँटीन बंद पडली आहेत, पण तरीही राज्यात गॅस व इंधनाचा पुरेसा साठा असल्याचा दावा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज केला.
राज्यात घरगुती एलपीजीची दैनंदिन मागणी 9 हजार मेट्रिक टन असताना उत्पादन वाढवून ते 11 हजार मेट्रिक टनांपर्यंत नेले आहे. मार्च महिन्यात गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात सिलिंडर उपलब्ध आहेत. पेट्रोल आणि डिझेलचाही पुरेसा साठा उपलब्ध असून रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होत राहील याबाबत नागरिकांनी निश्चिंत राहावे, असे छगन भुजबळ यांनी आज एक्स या समाजमाध्यमातून सांगितले.
गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष समित्या स्थापन केल्या आहेत. रुग्णालये, शाळा, आश्रमशाळा आणि अत्यावश्यक सेवांना गॅस पुरवठा प्राधान्याने मिळेल, याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही तांत्रिक अडचणी किंवा तक्रारींसाठी तालुका तसेच जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष आणि व्हॉट्सअॅप सुविधा तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुरवठा विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. राज्यातील गॅस आणि इंधन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.
























































