कृषी उत्पन्न बाजार समितीत विकासाची अनेक कामे केली. तरीही आठ असंतुष्ट संचालकांनी आपल्या विरोधात खोटे आरोप करून मंत्री हसन मुश्रीफ यांचे कान भरण्याचे काम केले. आजपर्यंत आपण पक्ष निष्ठsने काम केल्याने, स्वाभिमानाशी तडजोड होऊ शकत नसल्याने सभापतिपदाचा राजीनामा जिल्हा निबंधकांकडे देणार आहे. तसेच मुश्रीफांसोबत राजकारण करत असताना सर्व संस्थांमधूनही राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेत असल्याची धक्कादायक घोषणाही सूर्यकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
सूर्यकांत पाटील म्हणाले, कागल तालुक्यात मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत 40 वर्ष राजकारण केले. बाजार समितीमध्ये सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यावर अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले. समितीची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. तरीही आठ संचालकांनी बाजार समितीच्या नेते मंडळींकडे आपल्या विरोधात तक्रार केली. ही बाब खटकणारी आहे. बाजार समितीत उत्पन्न वाढीसाठी अनेक संधी आहेत. काही लोक आड येत असल्याने विकास खुंटलेला आहे. बाजार समितीला जीएसटी, कांदा, धान्य विक्री या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी असताना काहीजण गैरमार्गामुळे त्याला अडथळा निर्माण करीत असल्याने समितीची प्रगती खुंटली आहे, असा आरोपही पाटील यांनी केला.

























































