
जम्मू-कश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी रविवारी कारवाईबाबत माहिती दिली. घटनास्थळारून एके रायफल, पिस्तुल आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. परिसरात अद्याप शोधमोहिम सुरू आहे.
सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शनिवारी मध्यरात्री उरी सेक्टरमधील बुच्छर भागात शोधमोहीम सुरू केली. सुरक्षा दलांनी या परिसरात कडक नाकेबंदी केली होती. मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांना एका झुडुपात संशयास्पद हालचाली दिसल्या. जवानांनी सदर ठिकाणी घेराव घालत दहशतवाद्याला शरण येण्याचे आव्हान दिले. मात्र दहशतवाद्याने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात जवानांनी केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला.
दरम्यान, शनिवारी जम्मू-कश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान एका ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरचा (JCO) मृत्यू झाला. ‘ऑपरेशन शेरी कलान’ अंतर्गत दुर्गम भागात शोधमोहीम राबवत असताना सुभेदार संदीप कुमार ढाका यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले. यात ढाका बेशुद्ध झाले. ढाका यांना तातडीने पोथा येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

























































