
अमेरिका, इस्त्रायल आणि इराण युद्धामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक गॅसचा निर्माण झालेला तुटवडा आणि महापालिकांनी फेरीवाल्यांवर सुरू केलेल्या कारवाईचा मोठा फटका एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटला बसला आहे. या मार्केटमध्ये दररोज भाजीपाल्याच्या सुमारे 130 गाड्या शिल्लक राहत असून उकाडा वाढल्यामुळे हा भाजीपाला सडू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. मालाला उठाव नसल्याने भाजीपाल्याचे भाव गडगडले आहेत. कोबी 4 तर फ्लॉवर 8 रुपये किलो दराने विकला जात आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि एमएमआरडीए क्षेत्रातील अनेक हॉटेल्स बंद झाले आहेत. त्यामुळे भाजीपाल्याची मागणी घटली आहे. परिणामी नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटकडे ग्राहकांनी पाठ फिरवली असल्याने मालाला उठाव नाही. मालाची राखण करण्याची वेळ व्यापाऱ्यांवर ओढवली आहे. मार्केटमध्ये दररोज भाजीपाल्याची सुमारे 600 गाड्यांची आवक होते. त्यापैकी जवळपास 20 ते 25 टक्के माल दररोज शिल्लक राहत आहे. मोठ्या प्रमाणात माल पडून राहत असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. मालाला उठाव नसल्याने भाजीपाल्याचे दर गडगडले आहेत. भोपळा 10, भेंडी 36, फरसबी 16, घेवडा 22, काकडी 12, कारली 16 आणि टोमॅटो 15 रुपये किलो दराने विकला जात आहे. सध्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे हा शिल्लक राहिलेला भाजीपाला खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे.
महागाईच्या आगीत पालिकांनी तेल शिंपडले
मध्य पूर्व आशियात सुरू झालेल्या युद्धामुळे भडकलेल्या महागाईच्या आगीत मुंबई आणि नवी मुंबईसह अन्य महापालिकांनी तेल ओतले आहे. या महापालिकांनी फेरीवाल्यांवर कारवाईचा धडाका सुरू केल्यामुळे त्यांनी एपीएमसी मार्केटमध्ये येणे बंद केले आहे. परिणामी मुंबईसह उपनगरात आणि एमएमआरडीए क्षेत्रात नागरिकांना भाजीपाला चढ्या दराने खरेदी करावा लागत आहे. हाच भाजीपाला एपीएमसी मार्केटमध्ये मात्र कवडीमोल दराने विकला जात आहे.
एपीएमसीत स्वस्त, किरकोळ बाजारात महाग
एपीएमसीकडे ग्राहक फिरकत नसल्याने भाजीपाल्याचे दर गडगडले आहेत. मात्र किरकोळ बाजारात हाच भाजीपाला ग्राहकांना चढ्या दराने खरेदी करावा लागत आहे. सरकारने थेट पणनच्या नावाखाली भाजीपाला नियमनमुक्त केल्यामुळे भाजीपाल्यांच्या दरावर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. एपीएमसी मार्केट चुकवून थेट मुंबईत जाणारा भाजीपाला संबंधित व्यापारी मनमानी पद्धतीने महाग विकत आहेत अशी प्रतिक्रिया एपीएमसीचे संचालक शंकर पिंगळे यांनी व्यक्त केली आहे.


























































