
देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू होणार आहे. भारतीय निवडणूक आयोग आज (ता. १५, रविवार) दुपारी ४ वाजता तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची अधिकृत घोषणा करणार आहे. नवी दिल्ली येथे होणाऱ्या या पत्रकार परिषदेनंतर संबंधित राज्यांमध्ये तात्काळ ‘आदर्श आचारसंहिता’ लागू होईल.
निवडणूक आयोगाची जय्यत तयारी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील पॅनल निवडणुकीच्या विविध टप्प्यांचे वेळापत्रक जाहीर करेल. यामध्ये निवडणुकीची अधिसूचना, उमेदवारी अर्ज दाखल करणे, अर्ज मागे घेण्याची मुदत, प्रत्यक्ष मतदानाचे टप्पे आणि निकालाची तारीख यावर शिक्कामोर्तब होईल.
पश्चिम बंगालकडे संपूर्ण देशाचे लक्ष
या निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चा पश्चिम बंगालची आहे. १७ व्या पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ ७ मे २०२६ रोजी संपत आहे. त्यामुळे मे महिन्यापूर्वी नवीन विधानसभा अस्तित्वात येणे घटनात्मकदृष्ट्या गरजेचे आहे. बंगालमध्ये यापूर्वी २०२१ मध्ये ८ टप्प्यांत मतदान झाले होते, मात्र यंदा भाजपने इतक्या प्रदीर्घ टप्प्यांच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तरीही, सुरक्षेच्या कारणास्तव येथे तीनपेक्षा जास्त टप्प्यांत मतदान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार
निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये आणि बंगालमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः बंगालच्या जनतेला खुले पत्र लिहिले असून अनेक विकासकामांचे उद्घाटन केले आहे. केरळ, तामिळनाडू आणि बंगालमध्ये प्रादेशिक पक्ष आपली सत्ता टिकवण्यासाठी जोमाने कामाला लागले आहेत.मार्च अखेर किंवा एप्रिलच्या सुरुवातीला मतदानाला सुरुवात होऊन मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निकाल लागण्याची चिन्हे आहेत.

























































