अरे भावा, शेजारील देशांवर हल्ले थांबवा! ‘हमास’ची इराणला विनंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Hamas Urges Iran Not to Target Neighboring Countries Amid War Saamana

मध्यपूर्वेतील इराणवर अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांनंतर इराण चवताळला आहे. अमेरिकेला मदत करणाऱ्या, अमेरिकेला लष्करी तळासाठी जागा देणाऱ्या शेजारील राष्ट्रांवर इराणने हल्ले चढवले. अर्थात हे हल्ले अमेरिकी तळांवर असले तरी त्यामुळे मध्यपूर्वेतील देशांमधील जनजीवनावर प्रचंड मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. त्याच बरोबर पॅलेस्टाइनच्या ‘हमास’ संघटनेला मदत करणाऱ्या देशांमधील तळांवर देखील इराणने हल्ले केल्यानंतर हमासला मिळणारी मदत देखील प्रभावित होण्याची त्यांना भीती आहे. त्यामुळे हमास ने पुढे येत इराणला जाहीर आवाहन केले आहे.

पॅलेस्टिनी सशस्त्र गट हमासने प्रथमच इराणच्या युद्धनीतीवर जाहीर भाष्य केले आहे. अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचा इराणचा अधिकार मान्य करत असतानाच, हमासने इराणला आपल्या शेजारील देशांना लक्ष्य न करण्याची विनंती केली आहे. इराणने कतार आणि तुर्कीसारख्या देशांच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागल्यानंतर हमासकडून ही दुर्मिळ प्रतिक्रिया आली आहे.

हमासने म्हटले आहे की, ‘आंतरराष्ट्रीय नियम आणि कायद्यांनुसार, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणला अमेरिकन-झिओनिस्ट आक्रमणाचा प्रतिकार करण्याचा पूर्ण अधिकार आहे.’

हमासने आपल्या आपल्या निवेदनात इराणी नागरिकांसाठी ‘आपले इराणी भाऊ’ असे म्हणत आवाहन केले आहे की, त्यांनी या संघर्षात शेजारील देशांना (Neighboring Countries) लक्ष्य करणे टाळावे. हे आवाहन महत्त्वाचे मानले जात आहे कारण कतार आणि तुर्की हे हमासचे प्रमुख पाठीराखे असून इराणच्या हल्ल्यांमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हमासने प्रादेशिक देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांना हे युद्ध तातडीने थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे.

लेबनॉनमधील हिजबुल्लाहने २ मार्चपासून इस्रायलवर हल्ले तीव्र केले आहेत, तर येमेनच्या हुथी बंडखोरांनी इराणला पाठिंबा दिला असला तरी त्यांनी अद्याप नवीन हल्ल्यांची धमकी दिलेली नाही.

ऑक्टोबर २०२५ पासून गाझामध्ये युद्धविराम (Ceasefire) लागू असला तरी, अधूनमधून हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. इराणसोबत युद्ध सुरू झाल्यावर सुरुवातीला गाझावरील इस्रायली हल्ले कमी झाले होते, मात्र आता त्यात पुन्हा वाढ होताना दिसत आहे.