
तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. लग्न मोडल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्याच नातेवाईक असलेल्या तरुणीला जबरदस्तीने एचआयव्ही (HIV) संक्रमित रक्ताचे इंजेक्शन टोचले आहे. या अघोरी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण आणि पीडित तरुणी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. काही दिवसांपूर्वी दोघांचे लग्न त्यांच्या कुटुंबीयांनी ठरवले होते. मात्र, लग्नापूर्वी चौकशी केली असता तरुणाच्या पालकांना एचआयव्ही असल्याची बाब समोर आली. खबरदारी म्हणून मुलाचीही चाचणी करण्यात आली असता, तोदेखील एचआयव्ही संक्रमित असल्याचे निष्पन्न झाले. ही गंभीर बाब समजताच मुलीच्या वडिलांनी संबंधित तरुणासोबतचे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. लग्न मोडल्यामुळे आरोपी तरुण प्रचंड संतापला होता. जर तरुणीलाही एचआयव्हीची लागण झाली, तर ती कोणाशीच लग्न करू शकणार नाही आणि शेवटी तिला आपल्याशीच लग्न करावे लागेल, असा विकृत विचार त्याच्या मनात आला. याच सूडबुद्धीने त्याने 11 मार्च रोजी तरुणीच्या घरात शिरून तिला जबरदस्तीने संक्रमित रक्ताचे इंजेक्शन टोचले. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित तरुणीच्या वडिलांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
पीडित तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोचारम आयटी कॉरिडॉर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.



























































