विज्ञान रंजन – भूमिगत रेल्वे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>विनायक

सध्याचा जगभरचा जमाना ज्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावाखाली आहे, त्यामध्ये ‘मेट्रो’ रेल्वे आणि त्यातही भूमिगत रेल्वेला जगभर पसंती आहे. सुसाट वेगाच्या या ट्रेन प्रवाशांना सुखद वाटतात. आज एकूणच पृथ्वीच्या गोलावर पिंवा भूगर्भात धडाडणाऱ्या ‘मेट्रो’ गाडय़ांविषयी. आपल्या देशात अशी रेल्वे तुलनेने खूप उशिरा आली. स्वातंत्र्यानंतर एवढय़ा मोठय़ा देशात सर्वंकष सुधारणा करायला लागणारा पैसा पुरेसा नव्हता. त्यामुळे अनेक महत्त्वाचे प्रकल्प लांबत गेले. मग त्यांचा खर्चही वाढला, परंतु वाढत्या लोकसंख्येला स्वदेशात होणाऱ्या धान्यावर ‘जेवू’ घालण्याची निकड अधिक होती. तो प्रश्न 1968 च्या ‘व्हीट रेव्हल्युशन’ने सोडवला. हरित क्रांतीची ही सुरुवात होती आणि त्यात आपल्या महाराष्ट्राचे पेंद्रीय कृषी/राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचं अत्यंत मोलाचं योगदान होतं.

त्यासोबतच औद्योगिक विकासाची पायाभरणी होत होती. मोठी धरणं, विविध शैक्षणिक संस्था, सहकारी उद्योग आणि अंतराळ संशोधन अशा अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याची आव्हानं होती. साहजिकच युरोप-अमेरिकेत 1945 मध्ये आलेला ‘टीव्ही’ हिंदुस्थानात 1959 मध्ये दिल्लीत आला आणि मुंबईत तो अवतरण्यासाठी सन 1972 उजाडावं लागलं.

हिंदुस्थानातली पहिली भूमिगत रेल्वे 1984 मध्ये कोलकाता येथे सुरू झाली. सध्या देशात मुंबई-पुणे-नागपूरसह एकूण 46 मेट्रोमार्ग असून 1120 किलोमीटरचा पसारा आहे. सगळी मिळून मेट्रो स्टेशन 798 असून सुमारे 30 लाख प्रवासी रोज प्रवास करतात.

जगात भूमिगत रेल्वेचा आरंभ 163 वर्षांपूर्वी 10 जानेवारी 1863 रोजी झाला. या रेल्वेला तिथे ‘टय़ुब रेल्वे’ असं नाव पडलं. 1830 मध्येच लंडन शहराला आता भूमिगत रेल्वेमार्गाची गरज आहे त्याची चर्चा सुरू झाली होती. चाचणी रेल्वेमार्ग म्हणून 1855 मध्ये किबल्सबर्थ येथे आधी एक वाहतुकीसाठीचा बोगदा बनवण्यात आला आणि 1863 मध्ये पॅडिंग्टन व फॅरिंग्डन या सहा कि.मी. मार्गावर डब्यांमध्ये गॅसचे दिवे असलेली, चक्क वाफेच्या भकd भकd इंजिनावर चालणारी भुयारी रेल्वे धावली तेव्हा ब्रिटिश लोकही चकित झाले. नंतर वर्तुळाकृती मार्गावरून धावणारी ही ट्रेन 1902 पासून विजेवर चालू लागली. आता ती 2 लेव्हलवर चालते. खूप खोलवर असलेली टय़ुब रेल्वे 20 मीटर खोल भूगर्भातून जाते. शिवाय वरच्या ‘टनेल’मधला जुना मार्ग आहेच. आता हा मार्ग 446 कि.मी. असून 332 स्टेशनांसह एकोणीस ‘रूट’वर वर्षाकाठी त्यावर 20 लाख प्रवासी प्रवास करतात.

भूमिगत रेल्वेत दुसरा क्रमांक लागतो तो हंगेरीची राजधानी असलेल्या बुडापेस्ट शहराचा. तिथे 1896 मध्ये अशी रेल्वे सुरू झाली. आता या ‘लाइन’वर 48 स्टेशन असून चार मार्गांवरचा विस्तार 40 किलोमीटरचा आहे.

त्यापूर्वी अमेरिकेत 1893 मध्ये भूमिगत रेल्वे न्यूयॉर्कमध्ये आली. सध्या तिथे 1389 किलोमीटरच्या 71 मेट्रो लाइन असून 1890 स्टेशन आहेत. फ्रान्समध्ये सन 1900 मध्ये सुरू झालेल्या मेट्रोची 28 मार्गांवर 517 स्टेशन आहेत. जर्मनीत भूगर्भातील ट्रेन 1902 मध्ये सुरू झाली. आता तिथे 386 किलोमीटर 24 मार्ग असून 423 स्टेशन आहेत. ग्रीसमध्ये 1904 मध्ये सुरू झालेल्या मेट्रोला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि विसाव्या शतकातच जगातल्या अनेक देशात मेट्रोचं जाळं निर्माण होऊ लागलं.

स्पेनमध्ये 1919, तर रशियात 1935 मध्ये, पॅनडात 1954, इटली 1955. त्यापूर्वीच जपानमध्ये सन 1927 मध्ये मेट्रो सुरू झाली. जपानी भूमिगत रेल्वेचा सध्याचा मार्ग 897 किलोमीटरचा असून 54 ‘रूट’वरून 743 स्टेशनांच्या या प्रवासात रोज 65 लाख जपानी प्रवास करतात.

चीनमध्ये 1971 मध्ये भूमिगत रेल्वे आली. आता तिथे 12062 किलोमीटरचे एकूण 329 मार्ग असून 8541 स्टेशन आहेत. भूमिगत रेल्वेचं हे जगातलं सर्वात मोठं जाळं असेल. स्वित्झर्लंडमध्ये केवळ 6 किलोमीटरचा एकच भूमिगत मार्ग असून 14 स्टेशनांवर थांबणारी ही भूगर्भीय ट्रेन 2008 मध्ये सुरू झाली. जगातला मेट्रोचा हा सर्वात कमी लांबीचा मार्ग असेल.

भूगर्भात बोगदे खणताना कुठे कुठे पाण्याखालूनही मार्ग न्यावा लागतो. त्यापैकी फ्रान्स आणि इंग्लंडला जोडणारा चॅनेल टनेल रेल्वेमार्ग इंग्लिश खाडीखालून जातो. हे अंतर 40 कि.मी. आहे. असा पाण्याखालचा दुसरा मोठा 23 किलोमीटरचा रेल्वेमार्ग जपानमधील ‘सिकन टनेल’ असून त्याची बांधणी 1988 मध्ये झाली. आपल्याकडे कोलकाता मेट्रो हुगळी नदीखालच्या 30 मीटर लांबीच्या बोगद्यातून जाते. मुंबईतली भूमिगत मेट्रो मिठी नदीखालून धावते. भविष्यात बाल्टिक समुद्राखालून ‘मेट्रो’ नेण्याचा जर्मनीचा विचार आहे.

असे भूमिगत बोगदे खणणारे प्रभावी टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) असे पहिले मशीन जगामध्ये सन 1800 मध्ये सर मार्क ब्रुनेल यांनी शोधून काढले. थेम्स नदीखाली बोगदा खणण्यासाठी ते 1825 मध्ये यशस्वीरीत्या वापरण्यात आले तेव्हा त्याला ‘टनेलिंग शिल्ड’ म्हटले गेले. अशा यंत्रांना ‘मोल’ पिंवा ‘वर्म’सुद्धा म्हणतात. त्याचा व्यास सुमारे 17 मीटरपर्यंत असू शकतो. लंडनची मेट्रो सुरू झाली तेव्हा मात्र हातांनी बोगदा खणून 1870 मध्ये टॉवर सब-वे तयार झाला आणि त्यात धातूचा पाईप सरकवण्यात आला. कदाचित म्हणूनच ‘टय़ुब-रेल्वे’ नाव आलं असावं!