
व्यावसायिक एलपीजी गॅस पुरवठय़ावर निर्बंध आणण्यात आल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंट्सची मोठी कोंडी झाली असून गॅस तुटवडय़ामुळे हॉटेल बंद ठेवावी लागत आहेत. सध्या 35 टक्के हॉटेल्स बंद आहेत. बुधवारपर्यंत हे प्रमाण 75 टक्क्यांपर्यंत जाईल, असे आहार संघटनेकडून सांगण्यात आले.
राज्यात पाच लाख तर मुंबईत आठ हजार मान्यताप्राप्त हॉटेल्स आणि रेस्टॉरंट आहेत. मुंबई शहरात पाईप गॅस असल्याने येथे हॉटेल्सवर परिणाम झाला नसला तरी उपनगरात गॅस तुटवडय़ामुळे अनेक हॉटेल्स बंद होत आहेत. बहुतेक हॉटेल्समध्ये मेन्यूलाही कात्री लावण्यात आली आहे. काही हॉटेल्स आठवडय़ातून तीन दिवस बंद आणि चार दिवस सुरू ठेवली जात आहेत.
व्यावसायिक गॅस पुरवठा पूर्ववत करण्याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांना पत्र लिहिले, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही संपर्क साधला मात्र समस्या सुटलेली नाही. पुरी यांच्याकडून पत्राला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. गॅस सिलेंडरच उपलब्ध नसेल तर पदार्थ कसे शिजवणार, असा प्रश्न पडला आहे. सरकार एलपीजी गॅसचा तुटवडा नाही, असे म्हणत असले तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. गॅस तुटवडा कायम राहिल्यास येत्या तीन दिवसांत शहरातील पाईप गॅस कनेक्शन असलेली 25 टक्के हॉटेल्स वगळून बाकी सगळी म्हणजेच सुमारे पाच हजार हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ ओढवेल, असे ’आहार’चे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी सांगितले.




























































