
सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदाच इच्छामरणाला मंजुरी दिल्यामुळे गाझियाबाद येथील 31 वर्षीय हरिष राणाचा अखेरचा प्रवास अंतिम टप्प्यात आला आहे. हरिषची जगण्याच्या असह्य छळातून सुटका करण्यासाठी त्याला दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात हलवण्यात आले. त्यावेळी त्याचा निष्पाप चेहरा अखेरचा पाहताना हरिषच्या कुटुंबीयांसह तेथील सर्वांनाच अश्रू अनावर झाले. न्यायालयाच्या निर्देशानुसार अत्यंत सन्मानपूर्वक हरिषच्या इच्छारणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
हरिष 13 वर्षांपासून कोमामध्ये मरणासन्न जीणं जगत आहे. प्रचंड वेदनांमुळे जगणे नकोसे झाले होते. त्यातून सुटका मिळवण्यासाठी हरिषतर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याला न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर इच्छामरणची पुढची प्रक्रिया मार्गी लागली. त्यानुसार हरिषला कुटुंबीय राहत असलेल्या भाडय़ाच्या घरातून गुप्तता पाळून खासगी वाहनाने ‘एम्स’ रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी हरिषचे कुटुंबीय अत्यंत भावुक झाले. आईवडिलांसह सर्वांनाच अश्रू अनावर झाले. त्याच्या या अंतिम प्रवासाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
आम्ही सर्वांची माफी मागतो! आईवडिलांना व्यक्त केली कृतज्ञता
मुलाची प्रचंड वेदनांतून सुटका करून घेण्यासाठी हरिषच्या आईवडिलांनी जड अंतकरणाने दुःख पचवले. याचवेळी त्यांनी समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आम्ही सर्वांची माफी मागतो. देवाने आम्हाला हे साक्षीदार बनवले आहे. आमचा मुलगा कुठेही असो, तो कोणत्याही मरणोत्तर जीवनात असो, आम्ही त्याला कधीही विसरणार नाही. 13 वर्षांच्या काळात आम्हाला खंबीर साथ दिलेल्या सर्वांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया हरिषचे वडील अशोक राणा यांनी दिली.



























































