एलपीजी तुटवड्यामुळे बेरोजगारीचे संकट, अनेक कंपन्या बंद पडण्याचा धोका; सरकारने तत्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण युद्धामुळे जगभरातील नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाच्या पुरवठय़ावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक देशांमध्ये एलपीजीचे संकट निर्माण झाले आहे. हिंदुस्थानातील अनेक राज्यांमध्ये हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बंद होण्याची भीती आहे. याशिवाय सरकारने औद्योगिक वापराच्या वायू पुरवठय़ावर निर्बंध घातले आहेत. या परिस्थितीत केंद्र आणि राज्यांनी हस्तक्षेप न केल्यास सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसमोर मोठे संकट निर्माण झाले असून या क्षेत्रांमध्ये मोठय़ा प्रमाणात बेरोजगारी वाढण्याची भीती आहे, असा इशारा ‘असोसिएशन ऑफ इंडियन एंटरप्रिन्युअर्स’ने दिला आहे.

संघटनेचे अध्यक्ष के. ई. रघुनाथन यांनी ‘एमएसएमई’ क्षेत्रासमोर निर्माण झालेल्या संकटाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यांनी सांगितले, की एलपीजी हे केवळ एक इंधन नसून दैनंदिन उत्पादनाची जीवनवाहिनी आहे. एलपीजी पुरवठा अनिश्चित झाल्यास किमती प्रचंड वाढतात. एमएसएमई क्षेत्र हा धक्का सहन करु शकत नाही. अनियमित पुरवठा आणि वाढलेल्या दरांमुळे अनेक कंपन्या बंद पडू शकतात किंवा उत्पादन घट होऊ शकते. अशा स्थितीत अनेकांचे रोजगार जाऊ शकतात, असे रघुनाथन म्हणाले.

एलपीजी पुरवठा सुरू करण्याची मागणी

एलपीजी तुटवडय़ामुळे निर्माण झालेले संकट रौद्ररूप धारण करण्यापूर्वी सरकारने काही ठोस पावले उचलून एमएसएमई क्षेत्राला सावरण्यासाठी मदत करायला हवी, असे रघुनाथन म्हणाले. अत्यावश्यक उद्योग आणि या क्षेत्राला एलपीजी पुरवठा सुरू करावा, या क्षेत्राला लागणाऱया पेट्रोलियम उत्पादनांवरील तात्पुरता व्हॅट कमी करावा तसेच एलपीजीचा काळा बाजार रोखावा, अशा काही सूचना रघुनाथन यांनी केल्या आहेत.

कामगारांवर उपासमारीची वेळ

गॅस सिलिंडरच्या तुटवडय़ाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालला आहे. मुंबईतील अनेक हॉटेल्स तसेच रस्त्यालगत लागणारे फूड स्टॉल्स बंद झाले आहेत. त्यामुळे बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मोठय़ा प्रमाणावर कामगार मूळचे उत्तर प्रदेश, बिहारचे रहिवासी आहेत. कमी दरात जेवण मिळण्याची पंचाईत झाल्याने ते कामगार गावी स्थलांतरित होत आहेत. बहुतांश कामगारांनी गावचा रस्ता धरला असून अनेक बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी कमी मनुष्यबळात काम करावे लागत आहे. त्यामुळे बांधकाम प्रकल्प रखडणार असल्याची चिन्हे आहेत.

उद्योगांची 700 कोटींची उलाढाल ठप्प!

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा सर्वाधिक फटका उद्योगांना बसत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतींमधील गॅसवर उत्पादन करणाऱया कंपन्या बंद होत असल्याने त्यांच्यात होणारी दैनंदिन सुमारे 700 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. औद्योगिक वसाहतींमधील फार्मा, फर्निस, फुड, स्टील, बिअर, पावडर कोटिंग करणाऱया कंपन्यांनी उत्पादित केलेले सुटे भाग तसेच पडून आहेत. या कारखान्यांना होणारा व्यावसायिक गॅसपुरवठा आठ दिवसांपासून बंद झाला. त्यामुळे लघु आणि मध्यम स्वरूपाच्या कारखान्यात होणारे सुटय़ा भागाचे उत्पादन बंद झाले. उत्पादनाची साखळीच बंद पडली आहे.