
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या टी-20 क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचा 7 गडी राखून धुव्वा उडविला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपमधील उपांत्य फेरीतील पराभवाची परतफेडही केली. या लढतीत न्यूझीलंडचा केवळ 91 धावांत खुर्दा उडाला हे विशेष. मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी हॅमिल्टन येथे खेळवला जाणार आहे. माउंट मौंगानुई येथील बे ओव्हल मैदानावर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला; मात्र तो संघाच्या चांगलाच अंगलट आला. किवी संघ अवघ्या 14.3 षटकांत 91 धावांवर गारद झाला. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील न्यूझीलंडची ही दहावी सर्वात कमी धावसंख्या ठरली. त्यांच्याकडून जेम्स नीशमने सर्वाधिक 21 चेंडूंत 26 धावा केल्या. त्याच्याशिवाय कर्णधार मिचेल सॅण्टनरने 19 चेंडूंत 15 धावा, कोल मॅकॉन्चीने 11 चेंडूंत 15 धावा आणि बेव्हॉन जेकब्सने 7 चेंडूंत 10 धावांचे योगदान दिले.






























































