जगज्जेतेहो, तुमच्यासाठी… हिंदुस्थानी क्रिकेटपटूंचा रंगला गौरव सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज बीसीसीआयने क्रिकेटचे जग आणि जगज्जेतेपद जिंकणाऱ्या पाचही जगज्जेत्या संघांचा गौरव करत त्यांच्या संस्मरणीय आणि ऐतिहासिक कामगिरीला मानाचा मुजरा केला. तसेच हिंदुस्थानी क्रिकेटची मूर्तिमंत भिंत अर्थातच ‘द वॉल’ राहुल द्रविड आणि माजी अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि महिला क्रिकेटपटू मिताली राज यांच्या कारकीर्दीचा सन्मान करत त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला. तसेच शुभमन गिलला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूच्या पुरस्काराने गौरविले.

हिंदुस्थानी क्रिकेटसाठी गेले वर्ष सोनेरी इतिहास रचणारे ठरले. एकाच वर्षात पाच आयसीसी करंडक जिंकत नवा इतिहास घडवणाऱया जगज्जेत्यांना एकाच मंचावर आणून त्यांचा सन्मान करण्यासाठी बीसीसीआयने नमन सोहळ्याचे आयोजन केले. त्यामुळे आज दिल्लीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हिंदुस्थानी क्रिकेटचे चमचमते तारे अवतरले होते. या जगज्जेत्यांमध्ये 19 वर्षाखालील मुलींचा आणि मुलांचा युवा संघ ज्यांनी टी-20 आणि वन डेचा वर्ल्ड कप काबीज केले होते. तसेच महिलांच्या संघाने प्रथमच वनडे वर्ल्ड कप जिंकत इतिहास बदलला होता. त्याआधी हिंदुस्थानच्या संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते आणि गेल्याच आठवडय़ात टी-20 चा वर्ल्ड कप तिसऱयांदा जिंकत नवा इतिहास घडवला होता. या साऱ्यांचा कौतुक सोहळा बीसीसीआयने मोठय़ा थाटात करून त्यांना जगज्जेतेपदाची भूक कायम राखण्याचे प्रोत्साहन दिले.

मुंबईचा आवाज कायम

प्रत्येक जगज्जेत्या संघात मुंबईकर खेळाडू होतेच, पण त्याचबरोबर मर्यादित क्रिकेट सामन्यांमध्ये अष्टपैलू कामगिरी केल्याबद्दल आयुष म्हात्रेला लाला अमरनाथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच 15 वर्षीय इरा जाधवला सर्वोत्कृष्ट ज्युनियर महिला क्रिकेटपटू म्हणून जगमोहन दालमिया करंडकाने गौरविले. आयुषसाठी गेले वर्ष ऐतिहासिक होते. तसेच इरानेही गेल्या वर्षी 19 वर्षाखालील मुलींच्या वन डे करंडक स्पर्धेत मेघालयविरुद्ध 346 धावांची विश्वविक्रमी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. एवढेच नव्हे तर मुंबई क्रिकेट संघटनेने सलग तिसऱ्यांदा राज्य संघटनेचा पुरस्कार पटकाविण्याचा पराक्रम केला.