
प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत उभारलेल्या बळीराम सावंत क्रीडानगरीत गेल्या चार दिवसांत कबड्डीचा रांगडा खेळ धडाडत होता. पण शेवटच्या दिवशी या रांगडय़ा खेळावर एका संघाने अक्षरशः चढाई केली. ती म्हणजे रत्नागिरीच्या वाघजाई क्रीडा मंडळाने. अजिंक्य पवारच्या पावरफुल्ल खेळाच्या जोरावर वाघजाईने फोडलेल्या डरकाळीत नाशिकच्या ब्रम्हा स्पोर्ट्स क्लबचा थरकाप उडाला अन् या संघाची 39-16 अशी शिकार करत जेतेपदावर झडप मारली.
स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषक राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत वाघजाईने केवळ स्पर्धा जिंकली नाही, तर मुंबईकरांची मनेही जिंकली. त्यांच्या खेळासमोर मुंबईच काय, नाशिकच्या ब्रम्हालाही देव आठवले इतका भन्नाट खेळ केला.
इंडियन ऑइल, एलआयसी, सारस्वत बँक आणि मुथुट फायनान्स यांच्या सहकार्याने रंगलेल्या या स्पर्धेत मुंबईचे तब्बल 14 तगडे संघ उतरले होते; पण उपांत्य फेरीतच त्या 14 संघांचे बारा वाजले. शेवटी अंतिम लढत रंगली रत्नागिरीच्या वाघजाई आणि नाशिकच्या ब्रम्हा स्पोर्ट्स क्लबमध्ये. पण हा सामना जसा सुरू झाला तसाच त्याचा शेवटही जणू ठरून गेला. वाघजाईने पहिल्याच पाच मिनिटांत असा तुफानी खेळ मांडला की, थराराचा धागाच तुटला. लोण चढवत त्यांनी 20-9 अशी आघाडी घेतली आणि सामना जवळजवळ तेव्हाच संपला. या झंझावाती खेळाचा नायक होता अजिंक्य पवार. त्याच्या पावरफुल चढायांनी ब्रम्हाच्या बचावाची अक्षरशः चाळण केली. त्याने चढाईचे दहा गुण मिळवत अंतिम फेरीवर आपली मोहोर उमटवली आणि मालिकावीराचा मानही पटकावला. ब्रम्हाकडे आकाश शिंदे, वैभव कांबळे, रत्नेश पाटील यांसारखे खेळाडू होते; पण त्या दिवशी वाघजाईसमोर ते सारे जणू सावलीसारखे वाटत होते. वाघजाईचा खेळ इतका झंझावाती होता की, मध्यंतराला 25-9 अशी आघाडी घेत त्यांनी सामन्याचे भविष्यच लिहून टाकले.
उपांत्य फेरीत वाघजाईचा धडाका
त्याआधी उपांत्य फेरीत वाघजाईने मुंबईच्या एसएसजी फाऊंडेशनचा 50-26 असा फडशा पाडला. या सामन्यात अजिंक्यने एकटय़ाने 17 चढाईचे आणि दोन पकडीचे गुण मिळवत धडाकेबाज खेळ केला. दुसऱया उपांत्य सामन्यात ब्रम्हा स्पोर्ट्स क्लबने पार्ले महोत्सव ऍकॅडमीचा 43-22 असा पराभव केला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा महेश सावंत, सुनील शिंदे, मनोज जामसुतकर, अनंत नर आणि हारुन खान या आमदारांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी महापौर श्रद्धा जाधव, सोनम जामसुतकर, निशिकांत शिंदे या नगरसेवकांसह, शाखाप्रमुख संजय भगत, मंडळाचे अध्यक्ष सुनील देसाई, संयुक्त कार्यवाह जयराम शेलार, क्रीडाप्रमुख संतोष सावंत आणि स्वप्नील सूर्यवंशीसह पदाधिकारी उपस्थित होते.




























































