
बारा ज्योतिर्लिंगांमधील एक क्षेत्र असलेले भीमाशंकर मंदिर दुरुस्तीसाठी अडीच महिन्यांपासून बंद आहे. भाविकांना तिथे दर्शनासाठी प्रवेश नाही. तरीही भाजपचे खासदार डॉ. निशिकांत दुबे यांना मंदिर खुले करून दर्शनाची विशेष व्यवस्था केली गेली. त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करत, महाराष्ट्रद्रोही निशिकांत दुबे काय तुमचा जावई आहे का, असा सवाल केला आहे.
भीमाशंकर मंदिर सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामासाठी 9 जानेवारीपासून दर्शनासाठी बंद आहे. मात्र झारखंडमधून हेलिकॉप्टरने आलेल्या खासदार दुबे यांना व्हीआयपी दर्शन दिले गेले. त्यावरून रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून टीका केली आहे. मराठी लोगो को पटक पटक के मारेंगे असे म्हणतात त्या खासदार दुबे यांना पायघडय़ा का, असे खडसे यांनी त्यात नमूद केले आहे.





























































