
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या पंधरा वर्षांपासून लटकले आहे. अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे असून काही पुलांची कामेदेखील अपूर्णच आहेत. मात्र असे असताना या महामार्गावर ‘टोल’धाड टाकण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. यासाठी पेणजवळील खारपाडा व कोलाडजवळ दोन पथकर नाके वसुलीसाठी तयार केले आहेत. पथकर वसुलीची अधिसूचना जारी करण्याचा डाव असल्याने येत्या काही दिवसांतच वाहनचालकांचा खिसा कापला जाणार आहे.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे पळस्पे ते इंदापूर या 84 किलोमीटर लांबीचे काम 2011 मध्ये हाती घेण्यात आले होते. 15 वर्षे होऊनही महामार्गाचे काम रखडले आहे. निधीची कमतरता, भूसंपादनाचे अडथळे आणि कंत्राटदारांची निष्क्रियता यामुळे हे काम अद्यापपर्यंत पूर्ण झाले नाही. सद्यस्थितीत नागोठणे आणि कोलाड येथील पुलांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. तसेच काही ठिकाणी सर्व्हिस रोडची कामे पूर्ण झाली नसल्याचे दिसून येते. मात्र असे असतानाही प्रवाशांना पहिल्या टप्प्यात दोन ठिकाणी टोल भरावा लागणार असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये खारपाडा आणि खांब या दोन ठिकाणी पथकर नाके उभारण्यात येत आहेत. पथकाचे नेमके दर अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध होणाऱ्या अधिसूचनेनंतर प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागतील, याचे चित्र स्पष्ट होईल, नॅशनल हायवे प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनीच नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली.
आधी सर्व सुविधा पुरवा
महामार्गाचे काम पूर्ण झालेले नसताना टोलवसुली सुरू करण्याची घाई प्रशासनाला का आहे, असा प्रश्नही आता नागरिक विचारू लागले आहेत. रस्त्यावर अजूनही खड्डे, अपूर्ण पूल, वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या सुविधा असताना प्रवाशांकडून टोल आकारणे कितपत योग्य आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे. या महामार्गाच्या कामामुळे गेल्या काही वर्षांत अनेक अपघात झाले असून अनेक निरपराध नागरिकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे रस्ता पूर्ण, सुरक्षित आणि दर्जेदार झाल्यानंतरच टोल आकारावा, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच महामार्गावर सुलभ शौचालये, स्ट्रीट लाईट, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पॉईंट आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.































































