
कल्याण पूर्व परिसरात सायबर ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणाचे अश्लील फोटो तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देत अज्ञात इसमाकडून वारंवार पैशासाठी ब्लॅकमेल केले जात होते. सततच्या धमक्यांमुळे मानसिक तणाव वाढल्याने हेमंत पांडे (45) याने टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणाचा तपास कोळसेवाडी पोलीस करत आहेत.
विठ्ठलवाडी परिसरात राहणारे हेमंत पांडे यांनी दोन महिन्यांपूर्वी कैलासनगर येथील आपल्या जुन्या घरात पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र हेमंत यांनी अचानक आत्महत्या का केली याबाबत कुटुंबीयांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. हेमंत यांचे मोठे भाऊ राजेश पांडे यांनी यासंदर्भात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हेमंत यांच्या आत्महत्येमागील कारण शोधण्यासाठी कुटुंबीयांनी त्यांच्या मित्रांशी संपर्क साधला. त्यावेळी एका मित्राने हेमंत काहीतरी सायबर गुन्ह्याच्या जाळ्यात अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली.
कुटुंबीयांनी हेमंत यांच्या बँक खात्याची तपासणी केली असता एप्रिल 2025 ते जून 2026 या कालावधीत त्यांच्या खात्यातून मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याचे दिसून आले. ही रक्कम अज्ञात व्यक्तीने आपल्या खात्यावर वळती करून घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अशा प्रकारे सतत होणाऱ्या पैशांच्या मागणीमुळे आणि बदनामीच्या भीतीमुळे हेमंत पांडे मानसिक तणावात होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला.




























































