अन्न सुरक्षा विभागाचे दोन राज्यांत मोठे छापे; 150 टन मुदत संपलेले अन्न आणि भेसळयुक्त पनीर जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) देशभरात विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत राजस्थान आणि झारखंडमध्ये छापेमारी केली. या छाप्यात तब्बल 150 टन मुदत संपलेले अन्नपदार्थ आणि भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आले आहे.

राजस्थानातील जयपूरमध्ये अन्न सुरक्षा विभागाने गोदामांवर टाकलेल्या छाप्यात दीड लाख किलो मुदत संपलेले नूडल्स, सॉस आणि मेयोनीज जप्त केले. छापेमारीत पॅकेटवरील एक्सपायरी डेट पुसण्यासाठी आणि नवीन तारीख छापण्यासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक उपकरणेही अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत. खराब झालेल्या अन्नाच्या पाकिटावर नवीन तारीख छापून ग्राहकांची फसवणूक केली जात होती.

झारखंडमध्येही मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आले आहे. मुदत संपलेले अन्न विकणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या पुरवठा साखळीचा आणि मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे, असे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. पॅकेज्ड फूड घेताना नागरिकांनी तारखा नीट तपासून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.