गलेलठ्ठ पगार मात्र बचत काहीच नाही! बंगळुरूच्या महागड्या जीवनशैलीमुळे तरुणाची ओढाताण; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगळुरू हे आयटी क्षेत्रातील करिअरसाठी स्वप्नांचे शहर मानले जाते, मात्र येथील वाढत्या महागाईने आणि राहणीमानाच्या प्रचंड खर्चामुळे नोकरी करणाऱ्या तरुणांच्या नाकीनऊ येत असल्याचे समोर आले आहे. नुकतीच एका तरुणाने सोशल मीडियावर शेअर केलेली त्याच्या चुलत भावाची कहाणी सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे. दरमहा दीड लाख रुपये पगार असूनही महिन्याच्या अखेरीस खिशात फारशी बचत राहत नसल्याचे वास्तव या पोस्टच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे.

एक्स (X) वर @AlfinCodes नावाच्या वापरकर्त्याने ही माहिती शेअर केली आहे. त्याचा चुलत भाऊ कम्प्युटर सायन्समध्ये पदवीधर असून दरमहा 1 लाख 50 लाख रुपये पगारावर बंगळुरूला एका टेक कंपनीत रुजू झाला. घरी परतलेल्या कुटुंबाला आणि नातेवाईकांना सुरुवातीला असे वाटले की, मुलाला मोठ्या शहरात मोठी नोकरी मिळाल्याने तो आता आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे स्थिरावला आहे. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच त्याला बंगळुरूच्या आर्थिक वास्तवाचा फटका बसला.

या तरुणाचा खर्च मांडताना युजरने सांगितले की, ऑफिसजवळील एका छोट्या अपार्टमेंटसाठी त्याला 36 हजार रुपये भाडे मोजावे लागते. अन्न आणि किराणा सामानासाठी साधारण 15 हजार रुपये खर्च होतात. शहरातील वाहतूक कोंडीमुळे कॅब आणि ऑटोचा खर्चच 8 हजार रुपयांच्या घरात जातो. याशिवाय विकेंडचा खर्च, स्विगी आणि कॉफी यांसारख्या गोष्टींवर 10 ते 12 हजार रुपये खर्च होतात. या व्यतिरिक्त वैद्यकीय खर्च, विविध सबस्क्रिप्शन, अनपेक्षित बिले आणि घरी पाठवावे लागणारे पैसे यामुळे महिन्याच्या शेवटी केवळ 15 ते 20 हजार रुपयांची बचत हाताशी उरते.

शहराबाहेर राहणाऱ्या लोकांसाठी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पगार मोठा वाटू शकतो, पण बंगळुरूसारख्या महानगरात हा पगार केवळ मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीच पुरेसा ठरतो, असा निष्कर्ष या पोस्टमध्ये काढण्यात आला आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही वापरकर्त्यांनी हे ‘बंगळुरूचे वास्तव’ असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी मेट्रो स्टेशनजवळ राहून किंवा ऑफिसपासून थोडे लांब राहून भाड्याचा खर्च वाचवण्याचा सल्ला दिला आहे. तरीही, मोठ्या पगाराच्या मागे धावताना बंगळुरूतील  महागाई बचतीच्या आड येत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.