
सिरीयल किलर ‘रामन राघव’ प्रमाणेच तळोजामध्ये एका माथेफिरूने दोघांची हत्या केली आहे. या माथेफिरूचे नाव तुहीन घोष असे असून त्याच्यावर पोलिसांनी झडप घातली आहे. पैशांची चणचण भासत असल्याने रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली. या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
‘रामन राघव’ हा 1960 च्या दशकातील मुंबईत धूमाकूळ घालणारा एक कुख्यात सिरीयल किलर होता. त्याने रस्त्यावर झोपलेल्या नागरिकांवर लोखंडी सळईने हल्ला करून 40 हून अधिक जणांची हत्या केली होती. असाच प्रकार तळोजात घडला आहे. तुहीन घोष या माथेफिरूने रस्त्यावरून जाणाऱ्या दोघांवर हल्ला करून त्यांची हत्या केली. सायकलवरून जाणाऱ्या राजू बासुमतारी या तरुणावर त्याने लोखंडी पाइपने हल्ला केला. राजू सायकलवरून खाली कोसळला आणि तडफडून त्याचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार पाहून दुचाकीवरून जात असलेल्या साईनाथ पाटील यांनी त्याला हल्ला का करत आहे, अशी विचारणा केली. मात्र तुहीनने त्याच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात साईनाथ गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
मी खूप रागात होतो
घटनेची माहिती मिळताच तळोजा पोलिसांनी तुहीनला अटक केली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. तुहीन हा तळोजा परिसरात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याच्यामुळे तो नैराश्येत होता. ‘माझ्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे मी खूप रागात होतो आणि त्याच रागातून मी दोन निष्पापांची हत्या केली,’ असे त्याने पोलीस अधीक्षक विक्रम कदम यांना सांगितले.



























































