
ताडोबात जंगलात फिरायला जाणाऱ्या लोकांनी पुन्हा एकदा आपल्या बेताल वागणुकीचा प्रत्यय आणून दिला. वाघ रस्त्यावर असताना त्याच्या जवळ जाऊन फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा आगाऊपणा या लोकांनी केला. आता या उपद्रवी लोकांना हे धाडस अंगलट येणार असून वन विभाग त्यांच्यावर कारवाई करणार आहे.
ताडोबात वाघाजवळ जात फोटो काढण्याचा प्रयत्न अंगलट; वनविभाग कारवाई करणारhttps://t.co/4xE5f4OdaV pic.twitter.com/loOTkclVDW
— Saamana Online (@SaamanaOnline) March 16, 2026
ताडोबाचे प्रवेशद्वार असलेल्या मोहर्लीपर्यंत कुणालाही आपल्या वाहनाने जाता येते. हा संपूर्ण मार्ग जंगलाने व्यापलेला आहे. रविवारी जंगलात भटकायला जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. या रविवारी मोहरली गावाजवळ एक वाघ जंगलातून बाहेर निघाला आणि डांबरी मार्गावर आला. तेव्हा उपस्थित लोकांनी वाहनांबाहोर पडत वाघाच्या जवळ जात व्हिडिओ आणि फोटो काढण्याचा प्रयत्न केला. हे सर्व दृश्य कॅमेरात कैद झाले. लोकांनी केलेले हे धाडस त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती. हा प्रकार त्यांच्या अंगलट येऊ शकला असता. वाघाने हल्ला केला असता तर अनर्थ घडला असता. मात्र, वाघाने तिथून निघून जाणे पसंत केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मात्र लोकांचा हा धिंगाणा बघून वन विभागाने या उपद्रवी लोकांची ओळख पटवण्याचे काम सुरू केले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
























































