
बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आगामी IPL 2026 चे सामने आयोजित करण्याबाबतचे अनिश्चिततेचे ढग अखेर दूर झाले आहेत. कर्नाटक सरकारने कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनला (KSCA) स्टेडियममध्ये सामने भरवण्याची अधिकृत परवानगी दिली आहे. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली विधान सौधा येथे झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. तज्ज्ञ समितीने 13 मार्च रोजी स्टेडियममधील पायाभूत सुविधा आणि सुरक्षा उपायांची सखोल पाहणी करून आपला सकारात्मक अहवाल सादर केला होता, ज्यामुळे आता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
आगामी हंगामातील पहिला सामना 28 मार्च रोजी गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात याच ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाईल. केएससीएचे सचिव संतोष मेनन यांनी दुजोरा दिला आहे की, समितीने स्टेडियममध्ये केलेले बदल आणि मॉक ड्रिलच्या प्रदर्शनावर पूर्ण समाधान व्यक्त केले आहे. गृहमंत्र्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर आयोजनाला हिरवा कंदील दाखवला असून, यामुळे बेंगळुरूमध्ये क्रिकेटच्या थराराचे पुनरागमन निश्चित झाले आहे.
IPL 2026 – कोलकाता नाईट रायडर्सची ही मोठी चूक, अनिल कुंबळेने फटकारले
दरम्यान, गेल्या वर्षी आरसीबीच्या जेतेपदानंतर आयोजित ‘व्हिक्ट्री परेड’ दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमुळे स्टेडियमच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. त्या दुर्घटनेत 11 जणांना आपला जीव गमवावा लागल्याने 2026 टी20 वर्ल्ड कपचे सामनेही बेंगळुरूवरून दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांत स्टेडियम प्रशासनाने सुरक्षा मानकांमध्ये आणि पायाभूत सुविधांमध्ये व्यापक सुधारणा केल्या आहेत. या कडक उपाययोजनांनंतर आता प्रशासनाने पुन्हा एकदा सामन्यांच्या यजमानपदावर विश्वास दर्शवला आहे, जो डिफेंडिंग चॅम्पियन आरसीबीसाठी त्यांच्या घरच्या मैदानावर खेळण्याचा मोठा फायदा ठरेल.

























































