Oscar 2026 मध्ये धर्मेंद्रची उपेक्षा; इन मेमोरियम यादीत नाव, पण मंचावर श्रद्धांजली नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात, दिवंगत कलाकारांना श्रद्धांजली देणाऱ्या इन मेमोरियम विभागावरुन वाद निर्माण झाला आहे. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे नाव अधिकृत यादीत असतानाही, त्यांचा उल्लेख टीव्हीवर दाखवलेल्या मुख्य कार्यक्रमात करण्यात आला नाही. धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर 2025 ला मुंबईतील घरी वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या सहा दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिले होते.

ऑस्कर सोहळ्यातील ‘इन मेमोरियम’ विभागात मागील वर्षात दिवंगत झालेल्या कलाकारांना श्रद्धांजली दिली जाते. धर्मेंद्र यांचे नाव Academy of Motion Picture Arts and Sciences च्या अधिकृत ऑनलाइन श्रद्धांजली यादीत समाविष्ट होते. मात्र थेट प्रसारित कार्यक्रमातील व्हिडिओ मोंटाजमध्ये त्यांचा उल्लेख झाला नाही. यामुळे हिंदुस्थानी चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. धर्मेंद्र यांसारख्या जागतिक पातळीवर ओळखल्या जाणाऱ्या हिंदुस्थानी अभिनेत्याला श्रद्धांजली न दिल्याने अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. काहींनी हे हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीकडे दुर्लक्ष असल्याचे म्हटले आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी BAFTA Awards 2026 च्या ‘इन मेमोरियम’ विभागात धर्मेंद्र यांना श्रद्धांजली देण्यात आली होती. यंदाच्या ऑस्करमध्ये काही इतर आंतरराष्ट्रीय कलाकारही टीव्ही प्रसारणातील ‘इन मेमोरियम’ भागातून वगळले गेल्याने या विभागावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.