Ratnagiri News – खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या रिक्षाचालकांवर फौजदारी कारवाई; आरटीओचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

ऑटोरिक्षा परवाना मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे किंवा चुकीचे प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या अर्जदारांवर आता कडक कारवाई करण्यात येणार आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकरणांमध्ये दोषी आढळल्यास संबंधित चालकाचा परवाना निलंबित केला जाईल. तसेच, शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. आरटीओ कार्यालयाने यापूर्वीच अशा 50 हून अधिक परवानाधारकांना नोटिसा बजावल्या असून, टप्प्याटप्प्याने कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

शासकीय नियमांनुसार, ऑटोरिक्षा परवाना मिळवण्यासाठी अर्जदार कोणत्याही सरकारी, निमसरकारी किंवा खासगी संघटित क्षेत्रात नोकरीला नसावा, अशी मुख्य अट आहे. यासाठी अर्जदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाते. मात्र, अनेक व्यक्ती नोकरीवर असतानाही खोटी माहिती देऊन परवाना मिळवत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, पारदर्शकता राखण्यासाठी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी परिवहन प्राधिकरणाने हे कठोर पाऊल उचलले आहे.